उर्दू माध्यमातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची सातवीनंतर सुट्टीच, सर्वाधिक मुलींची संख्या
By भीमगोंड देसाई | Updated: December 20, 2024 12:41 IST2024-12-20T12:40:54+5:302024-12-20T12:41:31+5:30
शैक्षणिक भविष्य अंधकारमय, हायस्कूल, कॉलेजची संख्या कमी

उर्दू माध्यमातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची सातवीनंतर सुट्टीच, सर्वाधिक मुलींची संख्या
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमात शिकणाऱ्या १०५३ पैकी सातवीनंतर केवळ ४०२ विद्यार्थीच बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निम्याहून अधिक म्हणजे तब्बल ६५१ विद्यार्थी पुढील शिक्षणाला कायमस्वरूपी सुटी देत आहेत. शाळा सोडलेली मुले बालवयातच आई, वडिलांसोबत कष्टाची किंवा फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. मुलींची लग्न करून दिली जातात. हुशार असून, हे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळी सर्व समाजांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृह सुरू केली. शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मात्र काळाच्या ओघात बदल करीत केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढते आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी काही महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी सुरू केले आहे. या शाळांचा नावलौकिकही आहे. पण उर्दू शाळांमध्ये असा बदल झाला नाही.
पाचपैकी एका शाळेत सेमी इंग्रजीचा प्रयोग झाला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून तब्बल १०५३ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात. पण सातवीनंतर निम्याहून अधिक विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. बारावीनंतर उर्दूतून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही, इतकी अनास्था शासकीय शिक्षण प्रशासनामध्ये आहे.
उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या..
- पहिली ते सातवीपर्यंत : १०५३
मुले : ४०७
मुली : ६४६
- सातवी ते बारावीपर्यंत : ४०२
मुले : ११९
मुली : २८३
- सातवीपर्यंतच्या एकूण शाळा : ५
बारावीपर्यंत शाळा : २
‘मराठी’ शाळांकडेच दुर्लक्ष; तर उर्दूचे काय?
शहरातीत महापालिकेच्या असणाऱ्या ५३ मराठी माध्यमांच्या शाळांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवा, सुविधा मिळण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वर्गखोल्या, संरक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तितका निधी मिळत नाही. मराठी माध्यमाच्या शाळांची अशी स्थिती असेल तर उर्दू माध्यमातील शाळांकडे कोण पाहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
करिअर, उच्चशिक्षणात संधी कमी असल्याने दहा वर्षांच्या तुलनेत अलीकडे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून राज्य शासनाने शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करावा. करिअरमध्ये जागतिक पातळीवर प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला महत्त्व आले आहे. म्हणूनही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. - आदिल फरास, माजी नगरसेवक, कोल्हापूर
सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी उर्दू माध्यमांच्या हायस्कूल जवळपास पुरेशा प्रमाणात नाहीत. म्हणून मुस्लीम समाजातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे पुढील शिक्षण थांबवावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. पण सध्या असे होताना दिसत नाही. - हुमायून मुरसल, अभ्यासक, मुस्लीम समाज, कोल्हापूर