Kolhapur Crime: 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात ५ वर्षांमध्ये ५ कोटींहून अधिक रक्कम उकळली
By सचिन यादव | Updated: October 11, 2025 19:11 IST2025-10-11T19:10:53+5:302025-10-11T19:11:29+5:30
एका चुकीच्या मेसेजने आयुष्य उद्ध्वस्त

Kolhapur Crime: 'हनी ट्रॅप'च्या जाळ्यात ५ वर्षांमध्ये ५ कोटींहून अधिक रक्कम उकळली
सचिन यादव
कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणे. अश्लील व्हिडीओ काढल्याचे सांगून त्याआधारे ब्लॅकमेल करणे. फेसबुकवरून ओळख करून चॅटिंग आणि नंतर बिझनेसच्या निमित्ताने मीटिंगची तयारी करणे, असे अनेक फंडे हनी ट्रॅपच्या टोळीकडून अवलंबिले जात आहेत. त्यांच्या जाळ्यात अनेक उच्चपदस्थ अधिकारी, नेते, पोलिस, उद्योजकांसह लोकप्रतिनिधींना अडकविले जात आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातून ५ कोटींहून अधिक रक्कम उकळली आहे.
हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात महिलांची टोळी कार्यरत आहे. त्यासाठी सोशल मीडियावरून मैत्री करून जाळ्यात ओढले जाते. चॅटिंग करून सर्व आर्थिक माहिती घेतली जाते. तेथूनच लुबाडणुकीची सुरुवात होते. फोटोही मिक्सिंग करून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. व्हॉटसॲपवर केलेले चॅटिंग दाखविण्याची भीती दाखविली जाते. या जाळ्यात अनेक मोठे व्यापारी, व्यावसायिक अडकले आहेत. काही प्रकरणात टोळीतील एकाने पत्नीचा हनी ट्रॅपसाठी वापर केल्याचे समोर आले.
या घडल्या घटना
१८ जून, २०२५
प्रेमाच्या जाळ्यात ओढून जवळीकता साधल्याचे फोटो आणि व्हिडीओची भीती घालत महिलेसह नऊ जणांनी व्यावसायिकाला ५८ लाख ५४ हजारांचा गंडा घातला. एमआयडीसी पोलिसांनी महिलेसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झालेल्यात निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचाही समावेश होता.
१८ जुलै २०२३
कोल्हापुरात एका तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून एका तरुणाची लुटमार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून ही फसवणूक केली. कोणालाही यासंदर्भात काही सांगितल्यास चॅट व्हायरल करण्याची धमकी देऊन मोठी रक्कम उकळली.
२० नोव्हेंबर २०२१
कोल्हापुरात एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून साडेतीन कोटींची खंडणी उकळणारी टोळी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणली. एका महिला फॅशन डिझायनरसह दोन सोने व्यापाऱ्यांना अटक केली होती. अश्लील व्हिडीओ काढल्याचे सांगून त्याआधारे ब्लॅकमेल करून या टोळीने व्यापाऱ्याकडून पैसे वसूल केल्याचे तपासातून उघड झाले होते.
एका चुकीच्या मेसेजने आयुष्य उद्ध्वस्त
हनी ट्रॅप हा फक्त एक इंटरनेट स्कॅम नाही, तर मानसिक, भावनिक आणि आर्थिक शोषणाचा धोकादायक खेळ आहे. सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी अति जवळीक टाळणे, संशयास्पद कॉल्स, व्हिडीओ कॉल्सला बळी न पडणे, हीच खरी सुरक्षा आहे. आजच्या डिजिटल काळात एका चुकीच्या मेसेजमुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. सावधान राहा, जागरूक राहा आणि स्वतःचे संरक्षण करा, असा सल्ला पोलिसांच्या सायबर विभागाने दिला आहे.
हनी ट्रॅपच्या जाळ्यात अनेकांना अडकविले जाते. मात्र, त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी असे काही प्रकार आढळल्यास जवळचे पोलिस स्टेशन किंवा मुख्यालयातील सायबर हेल्प डेस्कशी संपर्क साधावा. कोणीही बळी पडू नये. - योगेशकुमार गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक, कोल्हापूर.