माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:19 IST2025-10-23T12:17:29+5:302025-10-23T12:19:00+5:30
नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.

माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
भरत बुटाले -
कोल्हापूर : इचलकरंजीत गुरुवारी सकाळी मर्कटलीला पाहायला मिळाली. नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.
घडलं असं, गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता एएससी कॉलेजजवळच्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी एकजण दारात मोटारसायकल लावून गेला. त्याने मोटरसायकलला चावी तशीच ठेवली होती. तितक्यात एक माकड आलं आणि चावी काढून घेऊन छपरावर जाऊन बसलं. हे ज्यांनी पाहिलं ते आश्चर्यचकित झाले आणि तुमच्या गाडीची चावी घेऊन माकड गेलं, असं एकदम ओरडले. हे ऐकताच त्या गाडीमालकाने डोक्याला हात लावला. मग माकडाने चावी खाली टाकावी म्हणून सुरू झाले प्रयत्न. शेजारी बसलेल्या प्रत्यक्षदर्शी भाजी विक्रेत्याकडून काकडी घेऊन माकडाकडे फेकली.
नंतर गाजर टाकलं तरीही त्यांनं चावी खाली टाकली नाही. खाली गर्दी असूनसुद्धा ते निम्म्यावर येऊन फळीवर बसलं. दहा मिनिटांनंतर ते गाडीजवळ चावी टाकून रस्त्याच्या पलीकडे रिक्षावर जाऊन बसलं. हटकूनसुद्धा तिथेच बसलं. मग रिक्षा चालकाने त्याला दुकानातला खाऊ दिला. दाबात बसून तो खाल्ला पण ते हलायला काही तयार होईना. शेवटी कस्टमर आल्यामुळे रिक्षा चालू केली, त्यावेळी ते उडी मारून झाडावर जाऊन बसलं. तेथे जमलेली गर्दी ही गंमत पहात थांबली होती.