Kolhapur: सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार, सेवा रुग्णालयाच्या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:34 IST2025-09-27T12:33:50+5:302025-09-27T12:34:23+5:30
विस्तारीकरणाचा आराखडा सोमवारपर्यंत तयार करण्याच्या सूचना

Kolhapur: सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार, सेवा रुग्णालयाच्या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारणार
कोल्हापूर : कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या जागेचा तिढा सुटला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दोनशे मीटरची शिथिलता मिळाल्याने या जागेत २५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे सीपीआरमध्ये वाढत्या रुग्णांचा भार कमी होणार आहे.
यासंदर्भातील पत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द केले. येत्या सोमवारपर्यंत सीमा निश्चित करून विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यावेळी राज्याचे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
लाईन बाजार परिसरातील झूम कचरा प्रकल्पाच्या पाचशे मीटर बफर झोनच्या कठोर नियमांमुळे या जागेत सेवा रुग्णालयाचे विस्तारीकरण करता येत नव्हते. यासंदर्भात पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आरोग्याच्या कारणासाठी बफरझोनच्या नियमांत सवलत देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मंडळाला सवलत देण्याबाबत पत्रव्यवहार करण्याची लेखी विनंती केली होती.
त्यानुसार मंडळाने २०० मीटरची शिथिलता दिल्याचे पत्र शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेला दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष टीम नेमून बफर झोनची सीमा निश्चित करण्यास सांगितले. तसेच, क्रिटिकल केअर सेंटर, सिव्हिल हॉस्पिटल, महिला रुग्णालय आणि कॅथ लॅबसाठी आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे पालकमंत्र्यांनी आदेश दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर उपस्थित होते.
सेवा रुग्णालयाची श्रेणी वाढणार
सेवा रुग्णालयात सध्याच्या ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन होणार आहे. याशिवाय, मंजूर १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, १०० खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि ५० खाटांचे क्रिटिकल केअर युनिट तयार होणार आहे. कार्डियाक कॅथ लॅब, सिटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीही उपलब्ध होणार आहे.