Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:14 IST2025-11-14T13:13:05+5:302025-11-14T13:14:01+5:30
Local Body Election: आजी-माजी आमदारांचे मनोमिलन झाल्यामुळे नेमकी ही राजकीय व्यूहरचना कोणाला रोखण्यासाठी झाली आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा

Kolhapur: शिरोळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; राजेंद्र यड्रावकर-उल्हास पाटील एकत्र
शिरोळ : जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात गुरुवारी राजकीय भूकंप झाला. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील एकत्र आल्याची घोषणा केल्याने तालुक्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. आजी-माजी आमदारांचे मनोमिलन झाल्यामुळे नेमकी ही राजकीय व्यूहरचना कोणाला रोखण्यासाठी झाली आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात राजकीय समीकरणे बदलत आहेत. शाहू आघाडीच्या माध्यमातून शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाडमधील निवडणुका लढविल्या जाव्यात, अशी व्यूहरचना आमदार यड्रावकर यांनी केल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत भाजपचा एक गट यड्रावकर यांच्यासोबत आला आहे.
शिरोळमध्ये भाजपा-ताराराणी आघाडीकडून वेगळी आघाडीची व्यूहरचना सुरू असतानाच आमदार यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांनी एकत्र येण्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी शिरोळ येथे केली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे कितपत बदलणार हे येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.
आमदार यड्रावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहयोगी आहेत. उल्हास पाटील हे शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आमदार यड्रावकर यांना उल्हास पाटील यांच्या ताकदीची गरज आहे का? शिवाय राजू शेट्टी यांना रोखायचे आहे का? अशी देखील चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे. एकूणच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे. आमदार यड्रावकर व मी तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. - उल्हास पाटील, माजी आमदार
विकासाच्या कामामध्ये उल्हास पाटील व माझ्यामध्ये कोठेही अंतर येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे. भविष्यकाळातही असेच काम करू. सर्वांना बळ देण्याचे काम भविष्यात करू. - राजेंद्र पाटील-यड्रावकर आमदार