मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास
By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2023 16:36 IST2023-09-30T16:35:25+5:302023-09-30T16:36:20+5:30
कोल्हापुरात वाघनख्या ठेवणार असल्याने आनंदच

मंत्री मुनगंटीवार खऱ्याच वाघनख्या आणतील; हसन मुश्रीफांनी व्यक्त केला विश्वास
कोल्हापूर : राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे अनेक वर्षे राजकारणात आहेत, ते विद्वान व हुशार असल्याने ते शिवाजी महाराजांनी वापरलेल्याच वाघनख्या आणतील, याची मला खात्री आहे. आदित्य ठाकरे जे म्हणतात त्याबद्दल आपणाला खात्री नसल्याचा टोलाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.
शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष बाबा नेसरीकर यांच्या पुण्यतिथी समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनख्या महायुतीचे सरकार आणते याचा मला आनंद आहे. त्यापेक्षाही जास्त आनंद त्या कोल्हापूरात ठेवल्या जाणार असल्याने होत आहे. आदित्य ठाकरे यांना वाघनख्याबाबत काय माहिती आहे, हे मला माहिती नाही. मात्र, मंत्री मुनगंटीवार हे खऱ्याच वाघनख्याच आणतील, याची खात्री आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी धाडस केलेच कसे?
पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबीटकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत, शेतकरी संघात त्यांच्याच गटाचे पदाधिकारी असताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्याचे धाडस केलेच कसे? असा टोलाही शिंदे गटाच्या नेत्यांना लगावला.