Kolhapur: जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून..; बोलता बोलता मंत्री मुश्रीफ बोलून गेले, चर्चेला उधाण आले
By समीर देशपांडे | Updated: January 6, 2025 18:18 IST2025-01-06T18:12:42+5:302025-01-06T18:18:22+5:30
कोल्हापूर : मंत्र्यांचा शपथविधी झाला तरीही अजून पालकमंत्र्यांची यादी घोषित झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण याबद्दल प्रचंड उत्सुकता ...

Kolhapur: जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून..; बोलता बोलता मंत्री मुश्रीफ बोलून गेले, चर्चेला उधाण आले
कोल्हापूर : मंत्र्यांचा शपथविधी झाला तरीही अजून पालकमंत्र्यांची यादी घोषित झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री कोण याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. अशातच जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जायला पाहिजे’ असे वक्तव्य केल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची चर्चा पुन्हा सुरू झाली.
महायुतीचे सरकार आल्यानंतर १६ डिसेंबरला नागपूर येथे अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी झाला. परंतू त्यानंतर २१ दिवस झाले तरी अजूनही पालकमंत्रीपदाची नावे जाहीर झालेली नाहीत. कोल्हापूरला तर ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि नवे मंत्री प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आहेत. जर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री होतील अशी चर्चा आहे. तर ज्यांचे आमदार जास्त त्यांचे पालकमंत्री असेल ठरले तर मग आबिटकर यात बाजी मारू शकतात.
परंतू, महायुतीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सक्षम असलेल्या वरिष्ठ मंत्र्याकडे हे पद द्यायचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहजासहजी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरचा दावा सोडतील ही शक्यता कमी आहे.
अशातच जिल्हा परिषदेच्या मिनी सरस प्रदर्शन उदघाटनावेळी मुश्रीफ भाषणाला उभे राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागतासाठी मुश्रीफ यांना विमानतळावर जाण्याची गडबड होती. अशातच ते म्हणाले, ‘मला जरा गडबड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जायचे आहे.’ इतक्यात त्यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी शब्द बदलले.
ज्या पध्दतीने नागपूरमध्ये नितीन गडकरी बोलता बोलता पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव जाहीर करून गेले. त्याच पध्दतीने जाता जाता मुश्रीफ बोलल्याने त्यानंतर त्यांच्या पालकमंत्रीपदाची चर्चा रंगली.