Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:59 IST2025-05-16T11:58:20+5:302025-05-16T11:59:24+5:30
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण याभोवतीच आता राजकारण एकवटले आहे. अरुण डोंगळे यांनी स्वत:हून राजीरामा द्यावा ...

Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली..
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण याभोवतीच आता राजकारण एकवटले आहे. अरुण डोंगळे यांनी स्वत:हून राजीरामा द्यावा असे नेत्यांना वाटते. त्यांनी तो दिला नाही तर मग अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो.
गोकुळच्याराजकारणाशी अन्य सहकारी संस्थांतील राजकारणही जोडले गेले आहे. आता बाजार समितीत व शेतकरी संघात आमदार विनय कोरे यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. जिल्हा बँकेत एकहाती मंत्री हसन मुश्रीफ सत्तेत आहेत. तिथे आमदार सतेज पाटील व भाजपचे आमदार अमल महाडिक हे कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. प्रत्येकी दोन वर्षे विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना संधी दिल्यानंतर शेवटच्या वर्षी अध्यक्ष कोण असेल हे नेत्यांनी चर्चा करून ठरवावे असे आघाडी सत्तेत आल्यावरच ठरले होते. त्यामुळे नवीन अध्यक्षपद कुणाला द्यावे याचा निर्णय मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व आमदार कोरे हेच घेतील.
वाचा- डोंगळेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बजावले
यापूर्वी विश्वास पाटील यांनी दहा दिवस अगोदरच स्वत:हून राजीनामा दिला होता. डोंगळे यांच्याकडून तीच अपेक्षा होती. डोंगळे हे मुश्रीफ यांचे समर्थक मानले जातात आणि तेच नेत्याचा आदेश ऐकत नाहीत असे चित्र तयार झाल्यावर या सगळ्या घडामोडीची सूत्रे मुश्रीफ यांनीच हातात घेतली. फोन हातात घेतला आणि सगळी चक्रे त्यांनी एका रात्रीत फिरवून दाखवली. संघाच्या कार्यकारी संचालकांना सांगून संचालक मंडळाची बैठकही घेण्याची सूचना केली.
डोंगळे यांच्यावर अविश्वास आणायचा झाल्यास किमान ७ संचालकांनी सहीने तसे पत्र सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे द्यावे लागते. ते ७ दिवसांची नोटीस काढून संचालक मंडळाची सभा बोलवतात व त्यात मतदान घेऊन अविश्वासाचा निर्णय होतो. ठराव मंजूर होण्यासाठी १४ मते लागतात. परंतु, सत्तारूढ आघाडीकडे १७ संचालक आहेत. समजा, डोंगळे स्वत: राजीनामा देणार असतील तरीही संचालक मंडळाची बैठक बोलवून त्यातच राजीनामा द्यावा लागतो.
ऐकून घ्या..
अध्यक्ष डोंगळे यांची कार्यपद्धती अन्य संचालकांना सोबत न घेता एकटाच सगळा कारभार करण्याची आहे. त्याबद्दल वारंवार नेत्यांकडेही तक्रारी झाल्या आहेत. गुरुवारी त्यांच्याविरोधात जो उठाव झाला त्यामागे हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. आय ॲम ए चेअरमन, चेअरपर्सन.. ४० वर्षे सहकारात काम करतोय असे सांगत ते आपलेच म्हणणे पुढे दामटतात.. बोलताना ऐकून घ्या.. असे वारंवार म्हणत ते दुसऱ्यांचे जराही ऐकून घेत नाहीत, अशाही तक्रारी संचालकांनी बैठकीदरम्यान केल्या.