Kolhapur Municipal Election 2026: हसन मुश्रीफ, क्षीरसागरांनी केली महायुतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:10 IST2025-12-16T14:09:43+5:302025-12-16T14:10:23+5:30
पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळे

Kolhapur Municipal Election 2026: हसन मुश्रीफ, क्षीरसागरांनी केली महायुतीची घोषणा
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकीचा नारा दिल्यानंतर महायुतीचे काय? असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा सुरु असतानाच दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील रंकाेबा देवाला साक्षीला ठेवत महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याची घोषणा सोमवारी केली.
विशेष म्हणजे एक पाऊल मागे येऊ म्हणत आमदार क्षीरसागर यांनीही महायुतीसाठी आग्रह धरला. भाजपचे महानगरप्रमुख विजय जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना व भाजपने एकप्रकारे महायुतीवर शिक्कामोर्तबच केले. निमित्त होते रंकभैरव मंदिर दीपमाळांच्या जीर्णाेद्धार शुभारंभाचे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून ताकद लावणार आहे. रंकोबाचा गुलाल १६ जानेवारीला उधळणार आहे. कोल्हापूर शहराला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आपण महायुती म्हणून प्रयत्न करणार आहे.
आमदार क्षीरसागर म्हणाले, महायुती अभेद्य आहे. महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहे. पुढच्या काही दिवसांत आमच्यात जागा वाटप होऊन उमेदवार निश्चित केले जातील.
पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळे
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांचा उल्लेख करत आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापुरात पहिला मुस्लिम महापौर शिवसेनेमुळे झाल्याची आठवण जागवली. बाळासाहेबांनी बाबू फरास यांना पाठिंबा द्यायला लावल्यामुळे ते महापौर झाल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.