Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:41 IST2025-05-19T13:39:33+5:302025-05-19T13:41:04+5:30
कोल्हापूर : ‘ गोकुळ’चा मी नेता आहे, माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. ...

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले
कोल्हापूर : ‘गोकुळ’चा मी नेता आहे, माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. अशा शब्दात गवसे (ता. चंदगड) येथे एका लग्न समारंभात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना रविवारी सुनावले.
मंत्री मुश्रीफ यांचे स्वीय सहायक सिकंदर शानेदिवाण यांच्या कन्येचे लग्न गवसे येथे रविवारी होते. त्यासाठी मुश्रीफ यांच्यासह अध्यक्ष डोंगळे, संघाचे चार-पाच संचालक उपस्थित होते. लग्नाच्या अगोदर मंत्री मुश्रीफ स्वागतासाठी थांबले असता, तिथे अरुण डोंगळे समोर आले. यावेळी मुश्रीफ यांना राग अनावर झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
वाचा- राजीनामा नव्हे; नवीन अध्यक्ष कोण, हेच महत्त्वाचे - अरुण डोंगळे
‘गोकुळ’चा नेता मी आहे, माझा फोनही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात’, अशा शब्दात सर्वांच्या समोर सुनावले. लग्नाची घाई गडबड सुरू असल्याने कोणाच्या हे लक्षात आले नाही.
लग्नानंतर मंत्री मुश्रीफ तडक चंदगड शासकीय विश्रामगृहात गेले. तिथे अध्यक्ष डोंगळे यांच्यासह काही संचालक गेले. सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा झाली. यामध्ये मंत्री मुश्रीफ यांनी पुन्हा डोंगळे यांना झापले. विमानतळावर तुम्ही प्रसारमाध्यमांशी ज्या पद्धतीने बोलला ते चुकीचे होते. कशासाठी हे सगळे केले? तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळला होता, तुम्ही न बोलता राजीनामा देणे अपेक्षित होते. कोणत्याही नेत्याने सांगितलेले नाही, तुम्हालाच राजीनामा द्यायचा नव्हता, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
दोन दिवसात राजीनामा देतो?
मला वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे ही भूमिका घेतली, मला समजून घ्यावे. दोन दिवसात राजीनामा देतो, असे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी बैठकीत सांगितल्याचे समजते.