हातकणंगले : दोघा परप्रांतीय नेपाळी हॉटेल कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना काठी आणि लोखंडी सळीने मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावरील माले फाटा येथील बाबा हॉटेलमध्ये घडला. हॉटेल चालक टिपू सुलतान खतीब याच्यासह तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजता घडली आहे. जखमींवर हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.सावली हॉटेलचा व्यवस्थापक अभिषेक भोघारी (वय २४) आणि जितूकुमार ध्रूभारती (वय २४, रा. दोघे नेपाळ, सध्या रा. हेरले, ता. हातकणंगले) हे माले फाट्यावर पानटपरीमध्ये थांबले होते. बाबा हॉटेल चालकाने त्यांना बोलावून का थांबला यांची चौकशी केली. त्यातील एका कामगाराने हॉटेलचे मेन्यू कार्ड बघितले. यांचा राग आल्याने बाबा हॉटेलचा चालक टिपू सुलतान खतीब याने या दोन परप्रांतीय कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून मारहाण केली. त्यांचे सहकारी मोहमद कुरेशी, प्रवीण पाटील आणि मनोज कांदे (सर्व रा. हेरले) यांनी काठी आणि लोखंडी सळीने अभिषेक आणि जितूकुमार या दोघाना बेदम माराहाण केली. काठी आणि लाखंडी सळीने झालेल्या मारहाणीने दोघाच्या पाटी, मांडी, पायावर रक्तबंबाळ व्रण उठल्याने आणि रक्ताने शरीर माखल्याने मारहाणीचा प्रकार अमानुष असल्याचे उघड झाले. दोघा कामगारांना तत्काळ हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. या घटनेचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शरद मेमाणे तपास करत आहेत.माले फाट्यावरील हॉटेल चालकाच्या मग्रुरीला ग्राहक कंटाळले आहेत. चार -आठ दिवसाला या ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडत असतात. काहीचे हातपाय मोडले आहेत. तर काहींना अपंगत्वही आले आहे. पोलिसात तक्रार होतात मात्र नंतर परस्पर मागे घेण्याचे प्रकार घडतात. या हॉटेलचा मालक बाहेर जिल्ह्यात पोलिस अधिकारी असल्याने असे प्रकार मिटवले जात आहेत.
Kolhapur Crime: डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून परप्रांतीय कामगारांना मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:37 IST