तांदळातील सूक्ष्म प्लास्टिक कणांमुळे कर्करोग होण्याचा धोका, डॉ. अनिल गोरे यांचे संशोधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:58 IST2025-01-23T12:55:08+5:302025-01-23T12:58:58+5:30

शिवाजी विद्यापीठातील प्रा. जी. बी. कोळेकर यांचाही सहभाग

Microplastic particles in rice pose cancer risk, research by Dr Anil Gore | तांदळातील सूक्ष्म प्लास्टिक कणांमुळे कर्करोग होण्याचा धोका, डॉ. अनिल गोरे यांचे संशोधन 

तांदळातील सूक्ष्म प्लास्टिक कणांमुळे कर्करोग होण्याचा धोका, डॉ. अनिल गोरे यांचे संशोधन 

कोल्हापूर : बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्म प्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते. मात्र, हे कण आरोग्यासाठी किती घातक आहेत याचा उलगडा शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. अनिल गोरे यांनी संशोधनातून केला. भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांमध्ये सूक्ष्म प्लास्टिक कणांचा शोध लावणारे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. गोरे, प्रा. गोविंद कोळेकर (शिवाजी विद्यापीठ), पिनल भावसार यांनी केले.

डॉ. गोरे यांनी भारतातील विविध तांदळाच्या नमुन्यांचे सूक्ष्म प्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण केले. या अभ्यासात १०० ग्रॅम तांदळामध्ये सरासरी ३०.८ ± ८.६१ कण सूक्ष्म प्लास्टिक आढळले. हे कण मुख्यतः पारदर्शक फायबर स्वरूपाचे असून, १००-२०० मायक्रोमीटर इतक्या आकाराचे होते. पॉलिएथिलीन आणि पॉलिएथिलीन टेरेफ्थेलेट या प्रकारचे सूक्ष्म प्लास्टिक कण तांदळामध्ये प्रमुख प्रमाणात आढळतात. हे संशोधन जर्नल ऑफ ह्याझार्डस मटेरिअल्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

या अभ्यासाद्वारे तांदळातील सूक्ष्म प्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला. सूक्ष्म प्लास्टिक हे अत्यंत घातक दूषित घटक आहेत. यामुळे कर्करोग, श्वसन विकार आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषतः महिलांचे सूक्ष्म प्लास्टिक सेवन पुरुष आणि मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. डॉ. गोरे हे सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील रहिवासी असून, सुरतच्या तरसादिया इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल सायन्सेस येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.

डॉ. गोरे यांनी सूक्ष्म प्लास्टिक कमी करण्यासाठी काही उपाय सुचविले 

  • शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला दिला.
  • रोजच्या वापरामध्ये तांदूळ व्यवस्थित पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुण्याने त्यातील सूक्ष्म प्लास्टिक कणांचे प्रमाण कमी होते.

Web Title: Microplastic particles in rice pose cancer risk, research by Dr Anil Gore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.