कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:38 IST2025-02-25T13:37:56+5:302025-02-25T13:38:33+5:30
चुयेकर यांचे उपोषण मागे

कोल्हापूर खंडपीठ: १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट, पालकमंत्री आबिटकर यांचे आश्वासन
कोल्हापूर : खंडपीठाच्या चर्चेसाठी खंडपीठ कृती समितीला १५ दिवसात भेटीची वेळ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी (दि. २४) उपोषणस्थळी भेट देऊन सांगितले. त्यामुळे माणिक पाटील-चुयेकर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण संपवले. खंडपीठासाठी पुन्हा उपोषण करायला लागू नये, अशी अपेक्षा चुयेकर यांनी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी आंदोलन निर्णायक टप्प्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्रचे माणिक पाटील-चुयेकर यांनी १६ फेब्रुवारीपासून दसरा चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. खंडपीठाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खंडपीठ कृती समितीला वेळ द्यावा, असा आग्रह चुयेकर यांनी धरला होता. उपोषण मागे घेण्याबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार विनंती केली होती. तरीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर चुयेकर ठाम होते.
अखेर पालकमंत्री आबिटकर यांनी सोमवारी चुयेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. येत्या १५ दिवसात कृती समितीला भेट देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार भेट होऊन खंडपीठासाठी सरकार ठोस पावले उचलेल, असे त्यांनी सांगितले. बैठकीसह खंडपीठाच्या पाठपुराव्यासाठी सामूहिक प्रयत्न करून हा लढा गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
चुयेकर यांचे मनोगत प्रा. मधुकर पाटील यांनी वाचून दाखवले. लोकप्रतिनिधींसह सर्व संघटना, संस्थांनी मनोधैर्य वाढवल्यामुळे उपोषणाचे शिवधनुष्य पेलू शकलो, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अशोकराव माने, वसंतराव मुळीक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत, ॲड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासन मिळताच उपस्थितांनी गूळ वाटून आनंद साजरा केला.
कोण काय म्हणाले?
कोल्हापुरातील खंडपीठासाठी राज्य सरकारने आता आग्रही बनावे. सरकारला चुयेकरांच्या उपोषणाची दखल घ्यावी लागली. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन लवकरात लवकर कृती समितीची बैठक घडवून आणावी. - सर्जेराव खोत, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन
खंडपीठाच्या मागणीला मूर्त स्वरूप यावे, यासाठी चुयेकरांचे प्रयत्न उपयुक्त ठरतील. लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सगळ्यांनी खंडपीठासाठी प्रयत्न केले आहेत. यापुढेही ते सुरूच राहतील. निर्णायक लढा अंतिम टप्प्यात आला आहे. - धनंजय महाडिक, खासदार
निवडणुकांमुळे खंडपीठाचा मुद्दा थोडा पुढे गेला. याला पुन्हा गती देण्याचे काम चुयेकर यांच्या उपोषणाने झाले. खंडपीठ कृती समिती आणि मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. लवकरच या भेटीने खंडपीठाच्या मागणीला बळ मिळेल. - संजय मंडलिक, माजी खासदार