Kolhapur: मंत्री मुश्रीफ यांना गडहिंग्लजमध्ये ‘बालेवाडी’ साकारायचीय, पण..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:17 IST2025-01-10T18:15:52+5:302025-01-10T18:17:53+5:30
महत्त्वाकांक्षी क्रीडा संकुल : जागेच्या मालकीअभावी मैदानाच्या विकासात अडथळे

Kolhapur: मंत्री मुश्रीफ यांना गडहिंग्लजमध्ये ‘बालेवाडी’ साकारायचीय, पण..!
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये बालेवाडीच्या धर्तीवर सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याचा संकल्प वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोडला आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे २ कोटींच्या निधीतून मैदान विकासाचे काम सुरू आहे. परंतु, ‘त्या’ जागेची मालकीच अद्याप निश्चित न झाल्यामुळे त्यात अडथळे येत आहेत.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या प्रयत्नामुळे येथील वडरगे रोडवरील एम. आर. हायस्कूलच्या शेतीशाळेची १० एकर जागा उपलब्ध झाली आहे. याचठिकाणी सुमारे ५० कोटींचे भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मानस मुश्रीफ यांनी वेळोवेळी बोलून दाखवला आहे. परंतु, अद्याप जागेची मालकीच निश्चित न झाल्यामुळे कायदेशीर व तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत.
'फुटबॉल'ची पंढरी म्हणून सर्वदूर ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहरासह तालुक्याला वैभवशाली क्रीडा परंपरा आहे. परंतु,सरकारी मैदान उपलब्ध नसल्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शासकीय क्रीडा स्पर्धा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी घ्याव्या लागतात. फुटबॉलचे राष्ट्रीय सामने येथील एम.आर.हायस्कूलच्या मैदानावरच होतात.त्यामुळे सुसज्ज क्रीडा संकुलाची गरज आहे.
जि. प.ची जागा सरकार हक्कात?
करवीर संस्थानकडून मिळालेल्या जमिनीत पूर्वी जिल्हा परिषदेच्या एम. आर. हायस्कूलची शेतीशाळा होती. गडहिंग्लज शहरातील ‘प्राईम लोकेशन’च्या या जागेवरच हे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. दरम्यान, ‘महसूल’च्या फेरफारात या जागेला सरकारचे नाव लागले असून, त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे नाव लावणे आवश्यक आहे.
वृक्षतोड परवानगीसाठी हेलपाटे !
नियोजित क्रीडा संकुलाच्या जागेवरील निलगिरीची झाडे तोडणे, विजेचे खांब स्थलांतरित करण्यासाठी ज्येष्ठ फुटबॉलपटू अर्जुन चौगुले, आण्णाप्पा गाडवी, अरविंद बारदेस्कर यांनी धडपड केली. परंतु, सागवानच्या जुन्या वृक्षतोडीच्या परवानगीसाठी नगरपालिका, वन विभाग व महसूलकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
फुटबॉल मैदान पूर्ण.. धावपट्टी अपूर्ण..!
फुटबॉल मैदानाचे काम पूर्ण झाले असून, वृक्षतोडीअभावी ४०० मीटर धावपट्टीचे काम अर्धवट राहिले आहे. कब्बड्डी, व्हॉलीबॉल व खो-खो या खेळांची मैदानेही तयार केली जाणार आहेत. फेब्रुवारीअखेर ही कामे पूर्ण होतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आदित्य भोसले यांनी सांगितले.