असा हा कारभार, दिव्यांग साहित्याचे झाले ‘भंगार’; कोल्हापूर जिल्ह्यात चार हजार लाभार्थ्यांचे साहित्य पडून

By समीर देशपांडे | Updated: May 29, 2025 19:10 IST2025-05-29T19:09:39+5:302025-05-29T19:10:41+5:30

समीर देशपांडे कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियाना’तून दिव्यांगांसाठी मिळालेल्या साहित्याचे ‘भंगार’ वास्तव समोर आले आहे. चार हजार ...

Materials of four thousand disabled beneficiaries lying around in Kolhapur district | असा हा कारभार, दिव्यांग साहित्याचे झाले ‘भंगार’; कोल्हापूर जिल्ह्यात चार हजार लाभार्थ्यांचे साहित्य पडून

कागल आणि आजरा येथील बचत गट विक्री केंद्रात अशा प्रकारे दिव्यांगांचे साहित्य पडून आहे

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियाना’तून दिव्यांगांसाठी मिळालेल्या साहित्याचे ‘भंगार’ वास्तव समोर आले आहे. चार हजार दिव्यांगांनी हे साहित्य नेले नसल्याने आणि याबाबत पुढे काय करायचे याबाबत अधिकारीही बेफिकीर राहिल्याने बाराही पंचायत समित्यांच्या इमारतींमध्ये हे साहित्य सडत पडले आहे. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना लाभार्थ्यांनी साहित्यच न नेणे आणि या साहित्याची पुढे विल्हेवाट न लावली जाणे हे शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे अपयश मानावे लागेल.

जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी या अभियानाचे नियोजन केले आणि ग्रामीण भागात हे अभियान २०१८ साली राबविण्यात आले होते. दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना नेमक्या काय साहित्याची गरज आहे याची नोंद घेण्यात आली. यातून २२ हजार ४०२ दिव्यांगांची नोंद झाली, तर त्यातील १५ हजार ७३६ दिव्यांगांना केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या ॲल्मिको कंपनीच्या माध्यमातून साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतरही सात महिने साहित्य पडून होते. अखेर केंद्रीय मंत्र्यांची तारीख मिळाल्यानंतर या साहित्य वितरणाचा कार्यक्रम शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात झाला; परंतु ऑक्टोबर २०२१ पर्यंत चार हजार दिव्यांगांनी हे साहित्यच नेले नव्हते. १५ नोव्हेंबरपर्यंत हे साहित्य संबंधित लाभार्थ्यांनी न नेल्यास ते परत पाठवण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी घेतला होता; परंतुही यात पुढे काहीच न झाल्याने पंचायत समित्यांच्या इमारतींमध्ये हे साहित्य गंजत पडले आहे.

हे साहित्य गंजून जाण्यापेक्षा दिव्यांगांच्या संस्था आणि शाळा यांना देण्यात यावे. जेणेकरून याचा वापरही होईल. काही दिव्यांगांचे मोबाइल नंबर चुकीचे असणे, पत्त्यावर संबंधित व्यक्ती नसणे यामुळेही काही साहित्य पडून आहे. याची शहानिशा करण्याची गरज आहे. - देवदत्त माने, अध्यक्ष, प्रहार संघटना
 

बाराही पंचायत समित्यांमध्ये पडून असलेल्या साधनांची तपासणी करून चांगले साहित्य दिव्यांगांना वितरित करण्यात येईल, तर जे साहित्य खराब झाले आहे. ते निर्लेखित करण्यात येईल.  - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर

Web Title: Materials of four thousand disabled beneficiaries lying around in Kolhapur district