सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा

By इंदुमती सूर्यवंशी | Published: March 4, 2023 02:24 PM2023-03-04T14:24:44+5:302023-03-04T14:26:23+5:30

उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता ५० हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले

Massive march of government employees teachers in Kolhapur to demand old pension | सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा

सरकारला आलंय टेन्शन.. द्यावी लागंल जुनी पेन्शन; कोल्हापुरात सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा विराट मोर्चा

googlenewsNext

कोल्हापूर : सरकारला आलंय टेन्शन द्यावी लागंल जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, जुनी पेन्शन न देणाऱ्या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.. अशा घोषणांनी अख्खे कोल्हापूर दणाणून सोडत शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराट मोर्चा काढत शनिवारी सरकारला जागं करण्याचा प्रयत्न केला. विकेंडच्या सुट्टीला भर दुपारी उन्हाच्या तडाख्याची पर्वा न करता ५० हजारावर सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले. ही सुरूवात आहे..आता राज्यभर मोर्चे काढू असा निर्धार यावेळी करण्यात आला.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांचा लढा सुरू आहे. त्यासाठी १४ मार्चपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला असून त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राज्य सरकारी निमसरकारी,, शिक्षक, शिक्षकेतर, महापालिका कर्मचारी समन्वय समिती व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

गांधी मैदानातून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. एकच मिशन जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या व पांढरी वेशभूषा करून कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शनिवार सुट्टीचा दिवस व भर दुपारच्या उन्हामुळे रस्त्यांवर तुलनेने गर्दी कमी होती पण मोर्चामुळे अख्खे शहर पॅक झाले. मिरजकर तिकटी, बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग होता. या मार्गाला लागून असलेल्या रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर येथे मान्यवरांची भाषणे झाली.

फलकांनी वेधले लक्ष..

जो देईल जुनी पेन्शनला साद, त्यालाच असेल आमची साथ, कोई तो निकालो इसका हल, बिना पेन्शन कैसे बितेगा कल, जुन्या पेन्शनचा वाद नका वाढवू, नाहीतर आम्ही सत्तेतून घालवू, ज्यांना आम्ही गादीवर बसवलं त्यांनीच आम्हाला रस्त्यावर आणलं, नका करू जुन्या पेन्शनची बेरीज नाही तर आणू सत्ताधाऱ्यांना जेरीस.

Web Title: Massive march of government employees teachers in Kolhapur to demand old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.