विळखा अमली पदार्थांचा: गल्ली बोळांत गांजाचा धूर; हरवला आयुष्याचा सूर
By उद्धव गोडसे | Updated: July 21, 2025 18:16 IST2025-07-21T18:16:07+5:302025-07-21T18:16:28+5:30
दीड वर्षात ३४८ किलो गांजा जप्त, विद्यार्थ्यांसह कष्टकरी वर्गाला विळखा

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : एमडी ड्रग्ज, चरस, कोकेनच्या तुलनेत परवडणारा, सहज उपलब्ध होणारा आणि दीर्घकाळ नशेत ठेवणारा अमली पदार्थ म्हणजे गांजा. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या गांजाने महाविद्यालयीन विद्यार्थी, गुन्हेगारी टोळ्या आणि कष्टाचे काम करणाऱ्या मजुरांना अक्षरश: विळखा घातला आहे. यातून अनेकांचे आयुष्य गांजाच्या धुराप्रमाणेच विरून गेल्याची वस्तुस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने याची रोजची उलाढाल लाखो रुपयांची आहे. गेल्या दीड वर्षात पोलिसांनी तब्बल ६ कोटी रुपयांचा ३४८ किलो गांजा जप्त केला. यावरून वापर झालेल्या गांजाचा अंदाज येऊ शकतो.
गांजाची तस्करी आणि विक्री करणारे अनेक रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहेत. यात काही स्थानिक, तर काही परप्रांतीय टोळ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक विक्रेत्याने स्वत:चे नेटवर्क तयार केले असून, त्यांची विक्रीची पद्धत गोपनीय असते. काही जणांकडून पान टपऱ्या, चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्यांवरून गांजाची विक्री केली जाते. काही विक्रेते ठरावीक वेळेत ठरावीक ठिकाणी येऊन थांबतात. त्याच वेळेत पोहोचलेले ग्राहक गांजाच्या पुड्या घेऊन काही क्षणात निघून जातात. अगदी गर्दीच्या ठिकाणीही त्यांचे व्यवहार शांतपणे सुरू असतात. ठिकाण बदलून विक्रीचे काम नियमित सुरू असते. शहरात छत्रपती शिवाजी पूल, शेंडा पार्क, सदर बाजार, तावडे हॉटेल, कावळा नाका, राजेंद्रनगर या परिसरात गांजाची विक्री होते.
आसाम, ओडिसा, आंध्रप्रदेश, शिमोगा, बेळगाव, सोलापूर येथून गांजाचा पुरवठा होतो. गांजा पुरवणारे नेटवर्क वेगळे आणि त्याची होलसेल, किरकोळ विक्री करणारे नेटवर्क वेगळे असल्याचे पोलिसांच्या तपासात अनेकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, दरवेळी यात नवीन टोळ्या सक्रिय होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
खरेदी १५ हजारांत, विक्री २० हजारांत
अलमेडा आणि शिलावती या दोन प्रकारचा गांजा कोल्हापुरात मिळतो. याचा खरेदी दर प्रतिकिलो १३ ते १५ हजार रुपये आहे, तर विक्री दर २० ते २२ हजार रुपये आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने विक्रेते मोठी कमाई करतात. सर्व व्यवहार रोखीनेच होतात. तस्करांच्या भाषेत दोन किलो २०० ग्रॅमच्या पॅकेटला पेटी म्हणतात. गांजासाठी ‘माल’, ‘चॉप्स’, ‘विड’, ‘मटेरियल’ असे शब्द वापरले जातात.
जिल्ह्यातही गांजाची शेती
जिल्ह्यातही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजाची शेती केली जाते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यांत दोन ठिकाणी शेतात छापे टाकून कारवाई केली. शेळकेवाडी (ता. करवीर) येथून १५ किलो गांजा जप्त केला, तर माद्याळ (ता. कागल) येथील शेतातून १२ किलो गांजा जप्त केला. यावरून जिल्ह्यातील गांजाच्या शेतीची वस्तुस्थिती समोर येते.
गुन्हेगारी वाढण्यास कारण
बहुतांश गुन्हेगार गांजाच्या नशेत असतात. गांजाच्या नशेतच ते गंभीर गुन्हे करतात. गेल्या वर्षी रंकाळा चौपाटीवर झालेल्या तरुणाच्या खुनातील सर्व आरोपी गांजाच्या नशेत होते, असे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले होते. हुतात्मा पार्क येथे गांजा ओढणाऱ्या तरुणांना हटकल्याने एका व्यक्तीचा खून झाला होता.
- जप्त गांजा - ३४८ किलो
- किंमत - ६ कोटी ९ लाख रुपये
- विक्रेते अटक - १७०
- ओढणारे अटक - ३१०
इतर अमली पदार्थांच्या तुलनेत गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्याबाहेरून येणारा गांजा रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा