Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीचं एकमत; 'महायुती'चं आज नेते ठरविणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:28 IST2025-12-19T12:27:41+5:302025-12-19T12:28:16+5:30
आबिटकर, मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांची होणार बैठक, क्षीरसागर, महाडिक यांचीही उपस्थिती

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीचं एकमत; 'महायुती'चं आज नेते ठरविणार
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, शेकापसह डाव्या पक्षांनी एकीची वज्रमूठ केली असून उद्धवसेना व राष्ट्रवादीने त्यांच्या जागांची अपेक्षा काँग्रेसला कळवली आहे. त्यानुसार आज, शुक्रवारी या तिन्ही प्रमुख पक्षांसह डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरवण्यात येणार आहे.
तर, महायुतीच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तुटेपर्यंत ताणू नये, अशी महायुतीच्या नेत्यांची भूमिका
महायुती ही निवडणूक एकत्रित लढणार हे निश्चित झाले आहे. नागपूरमध्ये हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली, तर पाटील यांनी गेल्याच आठवड्यात आमदार क्षीरसागर यांच्यासोबतही चर्चा केली आहे. अशातच सोमवारी मुश्रीफ यांनी क्षीरसागर यांच्यासोबत विविध विकासकामांचा प्रारंभ केला आहे. त्यामुळे औपचारिक, अनौपचारिक सर्व चर्चा झाल्या असून, त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आजपर्यंतच्या चर्चेत पालकमंत्री आबिटकर हे थेटपणे नव्हते; परंतु तेदेखील या बैठकीत सहभागी होणार असून निश्चित फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.
नागपूर येथील बैठकीवेळी मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाली असली तरी त्यावेळी राजस्थानला गेलेले आमदार क्षीरसागर अनुपस्थित होते. त्यांनीच कोल्हापूर महापालिकेसाठी प्रामुख्याने जोडण्या घातल्या असल्याने त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महत्त्व आहे.
नाराजी दूर करावी लागणार
महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याचा निर्धार तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. जागावाटपात आग्रही राहा; परंतू महायुती तुटेपर्यंत ताणून धरले जाऊ नये अशीच नेत्यांची भूमिका आहे. जरी काही उमेदवार तिकीट मिळाले नाही आणि नाराज झाले तर त्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी नेत्यांनी घेतली आहे. अपवादात्मक प्रकरणात मैत्रीपूर्ण लढत करायची की नाही हे अजून ठरलेले नाही. सध्या तरी महायुती म्हणून सगळे लढणार आहेत.
शिंदेसेनेच्या १८० जणांनी नेले अर्ज
शिंदेसेनेच्या १८० इच्छुकांनी गेल्या दोन दिवसांत संपर्क कार्यालयातून अर्ज नेले आहेत. तर ३९ जणांनी अर्ज पुन्हा जमा केले आहेत. उमेदवारांच्या उद्या शनिवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
उद्धवसेनेचा ३३, राष्ट्रवादीचा ३५ जागांचा काँग्रेसला प्रस्ताव
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. काही जागांवर एकमत झाले असून, काही जागांबाबत अंतिम टप्प्यातील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे या जागांवर तोडगा काढत आज जागावाटपाचा अंतिम फाॅर्म्युला ठरवण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीतील एका प्रमुख पदाधिकाऱ्याने दिली. उद्धवसेनेचा ३३ जागांचा तर राष्ट्रवादीचा ३५ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे.
महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. आघाडीतील घटक पक्षांना किती जागा हव्यात, कोणत्या प्रभागात ताकद किती यासह घटक पक्षांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली होती. या समितीने उद्धवसेनेसह राष्ट्रवादी व इतर डाव्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्याचा अहवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे.
उद्धवसेना, राष्ट्रवादीला किती जागा ?
महाविकास आघाडीत उद्धवसेनेने ३३ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला असून राष्ट्रवादीने ३५ जागांची अपेक्षा प्रस्तावात ठेवली आहे. या दोन्ही पक्षांच्या अपेक्षांवर प्राथमिक चर्चा करून अंतिमत: किती जागा द्यायच्या यावर आज शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
काँग्रेस-उद्धवसेनेतील चर्चा सकारात्मक दिशेने
आघाडीत उद्धवसेना व काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी अंतर्गत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांना सकारात्मक दिशा मिळाली आहे. ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचा प्रश्न पूर्णतः निकाली निघेल, असे उद्धवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी सांगितले.
महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही महापालिकेची निवडणूक लढवणार आहोत. राष्ट्रवादीने ३५ जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. आज किंवा उद्या फाॅर्म्युला ठरेल. -आर. के. पोवार, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट. कोल्हापूर
आम्ही ३३ जागांची मागणी केली असून यातील २० जागांवर आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाव्यातच ही आग्रही मागणी आहे. आघाडीतील चर्चा सकारात्मक दिशेने होत असून अंतिम निर्णय संपर्कप्रमुख घेतील. -रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख उद्धवसेना, कोल्हापूर.