Mahavikas Aghadi celebrates the victory of Lad and Asgaonkar | लाड, आसगावकर यांच्या विजयाचा महाविकास आघाडीकडून जल्लोष

कोल्हापुरात शुक्रवारी पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील ‘महाविकास आघाडी’चे उमेदवार अरुण लाड, प्रा. जयंत आसगावकर यांच्या विजयाचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. (छाया : नसीर अत्तार)

ठळक मुद्दे छत्रपती शिवाजी चौकात साखर-पेढे वाटप गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड, तर शिक्षक मतदारसंघामधून प्रा. जयंत आसगावकर हे विजयी झाले. त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि साखर-पेढे वाटून त्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित होते. गेल्या वेळी पुणे पदवीधरमधून निवडून आलेले भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाच वर्षांत पदवीधरांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे यावेळी बदल होणार, हे निश्चित होते. महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्या विजयाने हा बदल घडला असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.

अरुण लाड, जयंत आसगावकर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीने या निवडणुकीत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकजुटीच्या ताकदीवर हा विजय खेचून आणला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.

यावेळी ॲड. गुलाबराव घोरपडे, झहिदा मुजावर, संध्या घोटणे, महेश चव्हाण, प्रसाद उगवे, शिवसेनेचे सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, किशोर घाटगे, विक्रम जरग, सुनील देसाई, सचिन पाटील, विनायक फाळके, आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कार्यालयातही आनंदोत्सव

लाड आणि आसगावकर यांच्या विजयाचा आनंदोत्सव राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयातही करण्यात आला असल्याचे पोवार यांनी सांगितले.

 

Web Title: Mahavikas Aghadi celebrates the victory of Lad and Asgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.