कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र आघाडीवर : दत्तात्रय भरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:17 IST2026-03-30T18:16:23+5:302026-03-30T18:17:05+5:30
'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरात महाराष्ट्राचे कृषी क्षेत्र आघाडीवर : दत्तात्रय भरणे
कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकूलपती दत्तात्रय भरणे यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालयात विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, कृषी क्षेत्रात मुलींचा वाढता सहभाग हा सकारात्मक बदल असून, भविष्यातील प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. ‘आनंद द्या आणि आनंद घ्या’ हा यशाचा मूलमंत्र विद्यार्थ्यांनी अंगीकारावा, असेही त्यांनी आवाहन केले. येत्या १० दिवसांत मुलांच्या नवीन वसतिगृहास मंजुरी देण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचेही त्यांनी स्मरण केले.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी प्रास्ताविक केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे यांनी आभार मानले. डॉ. आनंद चवाई यांनी सूत्रसंचालन केले. मंत्री भरणे यांच्या हस्ते केंद्रीय कृषिमंत्री पुरस्कार प्राप्त शेतकरी, तसेच सात विविध संशोधन केंद्रासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, दत्तात्रय उगले, डॉ. गोरक्ष ससाने, डॉ. प्रशांत बोडके, मिलिंद ढोके, डॉ. इंदिरा घोनमोडे, डॉ. सुनील कराडे, डॉ. सोमनाथ माने, नगरसेवक आदिल फरास, बाबासाहेब पाटील, अरुण डोंगळे, कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सुनील कराडे उपस्थित होते.
'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण
यावेळी मंत्री भरणे यांनी नियोजित मुख्य प्रशासकीय इमारत, सभागृह, नियोजित अतिथीगृह इमारतीची पाहणी केली. त्यांच्या हस्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळील कृषी निविष्ठा उत्पादने व विक्री केंद्राचे उद्घाटन, उद्यानविद्या विभागांतर्गत 'हायड्रोपोनिक्स' प्रकल्पाचे लोकार्पण, शेतकरी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, नवीन विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन झाले.