महाराष्ट्र-कर्नाटकची कोगनोळी टोल नाक्यापर्यंत वाहतूक, महाराष्ट्र एसटीच्या चालकाला कर्नाटकात फासले होते काळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:20 IST2025-02-25T12:19:01+5:302025-02-25T12:20:39+5:30
प्रवाशांना दिलासा, कोल्हापुरातून २० हून अधिक फे-या

महाराष्ट्र-कर्नाटकची कोगनोळी टोल नाक्यापर्यंत वाहतूक, महाराष्ट्र एसटीच्या चालकाला कर्नाटकात फासले होते काळे
कोल्हापूर : प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आंतरराज्य सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यापर्यंत दोन्ही राज्यांकडून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांची संख्या पाहून दिवसभरात मध्यवर्ती बसस्थानकातून २० हून अधिक फे-या झाल्या. कोगनोळी टोल नाक्यापासून पुढील प्रवासासाठी कर्नाटकाकडे प्रवासी जात आहेत.
चित्रदुर्ग (कर्नाटक) येथे महाराष्ट्र एसटीच्या चालक, वाहकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्राची एसटी सेवा बंद झाली. त्यामुळे कर्नाटकात जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
त्या पार्श्वभूमीवर सोमवारी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिका-यांनी विभागीय कार्यालयातील अधिका-यांची भेट घेतली. विद्यार्थी, नोकरदारांनी या मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करावी, अशी मागणी एसटीकडे केली होती. त्यांचे हाल होऊ नये म्हणून कोल्हापूर आगाराच्या एसटी कोगनोळी टोल नाक्यापर्यंत धावत आहेत. तेथून कर्नाटकच्या एसटी पुढील मार्गासाठी तैनात ठेवल्या आहेत. त्यामुळे निपाणी, बेळगाव, हुबळी, बंगळुरू, सौंदत्ती, गंगावती, रामदुर्ग, धारवाड, दावणगिरी, शिमोगा या मार्गावर जाणा-या प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला.
रोज शिक्षण आणि नोकरीनिमित्त कोल्हापुरात येणा-यांना कोगनोळी टोल नाका ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत महाराष्ट्र एसटीने सुविधा केली. निपाणी वगळून सेनापती कापशी, माद्याळ, तमनाकवाडा मार्गे आजरा, चंदगड मार्गाकडे वाहतूक सुरू आहे. सोमवारी बसस्थानकात प्रवाशांची तुरळक गर्दी होती. प्रवाशांची गर्दी पाहून एसटी सोडली जात होती. बंदचा फायदा वडाप आणि खासगी ट्रॅव्हल्सधारक घेत आहेत. तत्काळ प्रवासासाठी प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला.
महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी अनिश्चित कालावधीसाठी रद्द केल्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. जोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येत नाहीत, तोपर्यंत थेट कर्नाटकात एसटी सेवा सुरू केली जाणार नाही. - मल्लेश विभूते, स्थानक प्रमुख