'Maharashtra has even more important issues, now' that 'subject is over', supriya sule | 'महाराष्ट्रासमोर त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता 'तो' विषय पुरे झाला' 

'महाराष्ट्रासमोर त्याहूनही महत्त्वाचे प्रश्न आहेत, आता 'तो' विषय पुरे झाला' 

ठळक मुद्देखासदार सुळे म्हणाल्या, कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे, असेही सुळेंनी म्हटले

मुंबई - गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा प्रदेश महिला मोर्चातर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. मात्र, आता बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय  मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यावरुन, खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. 

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. यासोबतच रेणू शर्मांच्या वकिलांनीदेखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचं म्हटलंय. 

हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असे खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी त्या शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी बोलत होत्या. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार संबंधित महिलेने मागे घेतली त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांला त्यांनी उत्तर दिलं. खासदार सुळे म्हणाल्या, कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात काय घडले हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे हा विषय आता पुरे झाला, राज्यासमोर त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न असून सर्वांनी त्यावर लक्ष द्यावे, असेही सुळेंनी म्हटले. दरम्यान, जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री व्हावे वाटते, या वक्तव्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. त्यामुळे अजित पवार यांनीही त्यात गैर काय असे म्हटले आहे, याची आठवणही सुप्रिया सुळेंनी करुन दिली. 

तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिच्यावर केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने काही दिवसांपूर्वी केलं होतं. ‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’, असे ट्विटमध्ये म्हटलं होतं. 
 

Web Title: 'Maharashtra has even more important issues, now' that 'subject is over', supriya sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.