Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील'
By कुणाल गवाणकर | Updated: January 18, 2021 17:23 IST2021-01-18T17:22:32+5:302021-01-18T17:23:08+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी घेऊनही चंद्रकांत पाटील अपयशी; खानापुरात शिवसेनेची सरशी

Maharashtra Gram Panchayat Election Results: 'एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील'
कोल्हापूर: अनेकांना पुण्यात सेटल व्हावंसं वाटतं. मात्र मला तसं वाटत नाही. त्यामुळे मी कोल्हापुरला परत जाणार नाही, असं म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच गावात धक्का बसला आहे. कोल्हापुरातल्या खानापुरात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. मात्र तरीही शिवसेनेनं भाजपला धक्का दिला. त्यामुळे भाजपप्रणित पॅनलला सत्ता गमवावी लागली आहे.
गारगोटीजवळ असलेल्या खानापूर गावामध्ये शिवसेनाप्रणित पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून चंद्रकांत पाटलांना धक्का दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना खानापूरमध्ये वेगळीच युती पाहायला मिळाली. राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं चित्र असताना खानापुरात शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असा सामना होता. मात्र तरीही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटानं सरशी साधली. हा पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
खानापूरमधील ग्रामस्थांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. 'खानापूर माझं गाव आहे. ते माझ्या मतदारसंघात येत नाही. माझा मतदारसंघ कोथरुड आहे. पण तरीही खानापूरातील जनतेनं दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. खानापुरात आमचा काही दारूण पराभव झालेला नाही. ६ पैकी ३ जागा भाजपला मिळाल्या आहेत. या जागा आम्ही २००-२०० च्या अंतरानं जिंकल्या आहेत. एक जागा आम्ही १७ मतांनी, तर दुसरी ६३ मतांनी आमच्या हातून गेली. अन्यथा निकाल ५-४ लागला असता. पण दोन जागा थोडक्यात हातून गेल्यानं निकाल ६-३ असा लागला,' असं पाटील म्हणाले. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे; महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आणि तिथे आमची विजयी घोडदौड सुरू असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं.