आजपासून महालक्ष्मी एक्स्प्रेस रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:56+5:302021-02-05T06:56:56+5:30
व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांसाठी वरदायी म्हणून महालक्ष्मी एक्स्प्रेसकडे पाहिले जाते. कोरोना महामारीत कोल्हापुरातून मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, ...

आजपासून महालक्ष्मी एक्स्प्रेस रुळावर
व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांसाठी वरदायी म्हणून महालक्ष्मी एक्स्प्रेसकडे पाहिले जाते. कोरोना महामारीत कोल्हापुरातून मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद, बंगलोर, आदी ठिकाणी सुटणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यापैकी कोयना ही कोल्हापूर ते मुंबई आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गोंदिया रेल्वे मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केली. त्यानंतर आता आज, सोमवारपासून महालक्ष्मी एक्स्प्रेसचे डबे रुळावर येणार आहेत. दिवसभर मुंबईमध्ये नियोजित काम करून पुन्हा रात्री या रेल्वेस बसल्यास दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पुन्हा येण्यास सोईस्कर म्हणून महालक्ष्मीकडे पाहिले जाते. त्यामुळे या रेल्वेगाडीस उद्योजक, व्यापारी, नोकरदारांची पहिली पसंती लाभलेली आहे. मध्ये रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस आज, सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कोल्हापूकरांनी स्वागत केले. आरक्षण खुले केल्यानंतर रविवारी सायंकाळपर्यंत ७० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
आता प्रतीक्षा हरिप्रियाची
कोरोनानंतर कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेस या दोनच रेल्वे सुरू होत्या. त्यात महालक्ष्मी एक्स्प्रेस आज, सोमवारपासून सुरू होत आहे. आता राज्यासह परराज्यातील प्रवाशांना कोल्हापुरातून तिरूपती देवस्थानला जाण्यासाठी हरिप्रिया ही रेल्वेगाडी कधी सुरू होते. याची उत्सुकता लागली होती. तीही बुधवार(दि. ३)पासून सुरू होत आहे. त्यामुळे थेट कोल्हापुरातील करवीरनिवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन अथवा तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन कोल्हापुरात दाखल होता येणार आहे. याही रेल्वेचे आरक्षण सुरू झाले आहे.