Kolhapur: माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत साकारणार माधुरीवाडा, सहा एकर जागेत उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:59 IST2026-03-06T12:56:19+5:302026-03-06T12:59:03+5:30

लवकरच बांधकामाला सुरुवात, पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच अत्याधुनिक केंद्र ठरणार

Madhuri Wada will be built on six acres of land for the rehabilitation of Mahadevi alias Madhuri Hattini in Nandani Jaysingpur kolhapur | Kolhapur: माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत साकारणार माधुरीवाडा, सहा एकर जागेत उभारणी

Kolhapur: माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी नांदणीत साकारणार माधुरीवाडा, सहा एकर जागेत उभारणी

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीच्या पुनर्वसनासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मठाच्या सहा एकर जागेत हत्तिणीसाठी सर्व सोयीनियुक्त असा प्रशस्त माधुरीवाडा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात येथील वनतारा प्रकल्प आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच अत्याधुनिक केंद्र ठरणार आहे.

महाराष्ट्र शासन, वनतारा आणि नांदणी मठ यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत माधुरी हत्तिणीच्या प्रकृतीचा आढावा घेऊन या केंद्राला हिरवा कंदील दाखविला होता. दरम्यान, केंद्र उभारण्याच्या पार्श्वभूमीवर परवानगींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकल्पासाठी महावितरण, ग्रामपंचायत, पाटबंधारे आणि पशुवैद्यकीय विभागाकडून आवश्यक परवाने प्राप्त झाले आहेत. सध्या केवळ बांधकाम परवाना, प्राणिसंग्रहालय विभागाचा परवाना मिळणे बाकी असून, लवकरच ही प्रक्रियाही पूर्ण होण्याची शक्यता आहे. वनताराचे तज्ज्ञ पथक लवकरच कोल्हापूर दाैऱ्यावर येणार असून, यात माधुरीवाडा प्रकल्पाचे अंतिम डिझाइन निश्चित केले जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल.

ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम

कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी या पुनर्वसन केंद्राची दर्शनी बाजू दगडी बांधकामाची असेल. आतमध्ये मात्र हत्तीच्या आरोग्यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामध्ये हायड्रोथेरेपी सेंटर, हत्ती ट्रॅक व शेड, पर्यटन व शिक्षण, कर्मचारी निवास, पर्यटन गॅलरी, पार्किंग व्यवस्था, देखरेखीसाठी टॉवर गॅलरी, पशुवैद्यकीय पथक यांचा समावेश आहे.

पहिलेच केंद्र

नांदणी येथे हा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर पर्यटनाला चालना मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अशाप्रकारचे पहिलेच अत्याधुनिक हे केंद्र ठरेल. जखमी किंवा आजारी हत्तींना याठिकाणी उपचार मिळतील. माधुरीवाडा हा केवळ निवारा नसून, हत्तींच्या सन्मानाने जगण्याचे आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचे केंद्र असेल.

Web Title : कोल्हापुर में हथिनी माधुरी के पुनर्वास के लिए बनेगा माधुरीवाड़ा

Web Summary : कोल्हापुर में हथिनी माधुरी के पुनर्वास के लिए छह एकड़ में 'माधुरीवाड़ा' बनेगा, जिसमें हाइड्रोथेरेपी जैसी आधुनिक सुविधाएं होंगी। वनतारा और नांदनी मठ के सहयोग से, यह पश्चिमी महाराष्ट्र का पहला केंद्र होगा।

Web Title : Madhuriwada: New Rehabilitation Center for Elephant Madhuri Coming Up in Kolhapur

Web Summary : Kolhapur is set to build 'Madhuriwada', a six-acre rehabilitation center for elephant Madhuri, featuring advanced facilities like hydrotherapy. A collaboration between Vanatara and Nandani Math, it's Western Maharashtra's first of its kind.