शहरात कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहीम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 13:08 IST2019-09-28T13:05:44+5:302019-09-28T13:08:43+5:30
शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे.

शहरात कुष्ठरोग, क्षयरोग शोधमोहीम राबविणार
कोल्हापूर : शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे.
सदरची मोहीम यशस्वी करण्यासाठी गुरुवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या सुचनेनुसार पंचगंगा हॉस्पिटल येथे कुष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्याधिकारी यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
ही मोहीम दि. १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात घरभेटी देऊन राबविण्यात येणार असून, कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण नोंदणी करणे आणि असंसर्गजन्य रुग्णशोध घेण्याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सूचना दिल्या.
वैद्यकीय अधिकारी यांनी भागामध्ये फिरतेवेळी, लसीकरण सत्रावेळी शहर प्लास्टिकमुक्त करण्याकरिता जनजागृती करणे, नागरिकांना परिसर स्वच्छता, ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीमध्ये देण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस कुष्ठरोग सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा समन्वयक असंसर्गजन्य रोग डॉ. सुदर्शन पाटील तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १ ते ११ चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.