कोल्हापुरात भरवस्तीत बिबट्या शिरला, पोलिसांसह चौघांवर केला हल्ला; बघ्यांची गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:52 IST2025-11-12T11:52:06+5:302025-11-12T11:52:28+5:30
बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले

छाया-नसीर अत्तार, आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्क परिसरात गजबजलेल्या उच्चभ्रूंच्या मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल वूडलँडमध्ये मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्याने पोलिस, वनकर्मचारी, हॉटेल व बंगल्याच्या उद्यानातील कर्मचाऱ्यांसह चौघांवर हल्ला केला.
बघ्यांची गर्दी आणि आरडाओरडीमुळे बिबट्या बिथरला आणि महावितरणच्या आवारातील ड्रेनेजच्या बंद टाकीत उघड्या दरवाज्यातून आत घुसला. तीन तासांच्या थरारानंतर बिबट्याला ‘ट्रॅन्क्यूलाइजर’ गनने इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. त्याला वन्यजीव उपचार केंद्रात निरीक्षणाखाली ठेवले आहे. बघ्यांची गर्दी आवरताना मात्र पोलिसांना नाकीनऊ आले. बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत अडथळा आल्याने पोलिसांनी लाठीमार केला.
बिबट्याच्या हल्ल्यात शाहूपुरीचे पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा बळवंत पाटील (४७, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), बाग कर्मचारी तुकाराम सिद्धू खोंदल (४४, रा. भोसले पार्क, कदमवाडी, कोल्हापूर), बंगल्यातील बाग कर्मचारी बाळू अंबाजी हुंबे (६५, रा. भोसले पार्क, कदमवाडी) आणि वनकर्मचारी ओंकार काटकर (२३, रा. पंचगंगा तालीमजवळ, कोल्हापूर) हे जखमी झाले. यातील खोंदल यांना जास्त दुखापत झाली आहे.
वाचा : पोलिस शिपाई कृष्णा पाटील यांनी धाडसाने परतवला हल्ला
ताराबाई-नागाळा पार्क परिसरातील टोलेजंग बंगले, रो-हाउस, उच्चभ्रू लोकवस्तीचा परिसर असलेल्या वूडलँड हॉटेल, महावितरण कार्यालय भागात दुपारपर्यंत तीन तास बिबट्याचा हा थरार नागरिकांनी अनुभवला. वूडलँड हॉटेल भागात बिबट्या सर्वप्रथम दिसला. १० ते १५ फुटांच्या भिंती सहज ओलांडत बिबट्याने वूडलँड हॉटेल परिसरात घुसला. मंगळवारी दुपारी विवेकानंद कॉलेजच्या समोरील गायत्री अपार्टमेंटच्या बोळातून एका बंगल्याच्या आवारातून हा बिबट्या या परिसरात शिरला. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या निकम यांच्या बंगल्याच्या आवारात आधी त्याने हल्ला केला.
वाचा : बिबट्या आला, पोलिसांना फोन केले, पण हलक्यात घेतले
त्यानंतर त्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. यावेळी तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर त्याने झेप घेतली. दडून बसण्याचा प्रयत्न करत असताना त्याने हॉटेल परिसरातील दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो गेला. यावेळी वन्यजीव विभागाच्या जलदगती पथकाचा कर्मचारी ओंकार काटकर पुढे गेल्यावर त्याच्या अंगावर त्याने झेप घेतली, त्यात तो जखमी झाला. यानंतर बराच काळ बिबट्या कोठे गेला, याचा शोध सुरू होता. ड्रोनचा वापर करून बिबट्या महावितरण कार्यालयाच्या आवारातील सिव्हिल उपविभागाच्या मागील बाजूला एका उघड्या चेंबरमध्ये घाबरून लपल्याचे आढळून आले.
..असा पकडला बिबट्या
महावितरणच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये घुसल्यामुळे बिबट्या आतच लपून बसला होता. चेंबरच्या एका बाजूला प्लायवूड टाकून ते बंद केले आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला जाळी लावली. बिबट्याने हल्ल्याच्या तयारीत उसळी मारून जाळीच्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच कर्मचाऱ्यांनी त्याला दाबून धरले आणि जाळीत अडकवले.
वाचा: परिसरात महाविद्यालय, भेदरलेल्या पालकांचा मुलांना फोन... कुठं हाईस तू?
वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर यांनी गनने प्राथमिक स्तरावरील भुलीचे इंजेक्शन देऊन ‘ट्रॅन्क्यूलाइजर’ (बेशुद्ध) केले, त्यामुळे त्याची आक्रमकता कमी झाली. त्यानंतर त्याच्या पायात हातातील सिरींजने दुसरे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याला उचलून पिंजऱ्यात ठेवले. त्यानंतर वन्यजीव विभागाच्या उपचार केंद्रात प्रयाग चिखली (ता. करवीर) येथे नेण्यात आले.
पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या
ताराबाई पार्कात जेरबंद केलेला बिबट्या चार वर्षांचा नर असून, पूर्ण वाढ झालेला आहे. साधारणतः साडेसहा ते सात फूट लांबीचा आणि साडेतीन फूट उंचीच्या बिबट्याच्या पंज्यात कमालीची ताकद आहे. हल्ला केलेल्या जखमा पाहता, त्याच्या ताकदीचा अंदाज येतो.
हॉटेलचे गार्डन सकाळी असते बंद..
हॉटेल वूडलँडचे गार्डन रेस्टाॅरंट सकाळी बंद असते. त्यामुळे तिथे फारसे कुणी नव्हते. बाग कर्मचारी साफसफाईचे काम करत होते. गोंधळामुळे तेथून बिबट्या पलीकडे गेला.
हुंबे रक्तबंबाळ..
बिबट्या हॉटेल वुडलॅंडच्या भिंतीवरून उडी मारण्याआधी शेजारच्या निकम बंगल्यावरील माळी बाळू हुंबे (रा. कदमवाडी) यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाचा बिबट्याने चावा घेवून त्यांना रक्तबंबाळ केले.
अन् मुलीने फोडला हंबरडा..
तुकाराम खोंदल यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे घरी समजल्यानंतर त्यांची पत्नी, मुलगी सीपीआरमध्ये वाऱ्याच्या वेगाने आली. वडिलांना पाहताच मुलीने त्यांना मिठी मारली आणि हंबरडा फोडला.. खोंदल आणि त्यांच्या पत्नीलाही अश्रू अनावर झाले.