निवास पाटील
सोळांकूर: काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याला कि. मी.६ मध्ये पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेता कालवा पात्राचा तळभागातून भले मोठे घळाचे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनेमुळे कालव्याचा मजबुतीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.सध्या काळाम्मावाडी धरणातून दुधगंगा डाव्या व उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. बुधवारी मध्यरात्री पाण्याचा जोरदार प्रवाहाने पनोरी येथील बोगद्याजवळ कालव्याला घळ पडला. बघताबघता या घळाने आपला आकार जवळपास दहा फुट व्यासाचा झाला. आणि रात्रभर त्यातून पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले. संपुर्ण शिवार जलमय होऊन शिवाराला महापूराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. तसेच दुधगंगा नदीला मातिमिश्रित गढुळ पाणी आले आहे.काळाम्मावाडी धरणापासून डाव्या व उजव्या या दोन्ही कालव्याचा दहा ते बारा किलोमीटरचा अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी कालवा फुटीचा घटना यापूर्वी वारंवार घडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पाटबंधारे खात्याने त्याची वेळीच दखल घेऊन डागडुजी करावी अशी मागणी होत आहे.