Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक 

By उद्धव गोडसे | Updated: December 11, 2024 13:47 IST2024-12-11T13:46:39+5:302024-12-11T13:47:25+5:30

सीबीआयकडून झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच कारवाई

Lawyer took bribe of 1 lakh 80 thousand to avoid confiscation, arrested red handed by CBI and ACB team in ichalkaranji Kolhapur District | Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक 

Kolhapur: जप्ती टाळण्यासाठी वकिलाने घेतली १ लाख ८० हजारांची लाच, सीबीआयसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ केली अटक 

कोल्हापूर : थकीत कर्जापोटी बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तात्पुरती टाळण्यासाठी अडीच लाखांच्या लाचेची मागणी करून १ लाख ७० हजार रुपये स्वीकारणारा इंडियन बँकेचा कायदा सल्लागार ॲड. विजय तुकाराम पाटणकर (वय ३८, रा. इचलकरंजी) याला अटक झाली. सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) रात्री इचलकरंजी येथे कारवाई केली. या कारवाईने इचलकरंजीसह जिल्ह्यात खळबळ उडाली.

तक्रारदारांनी इंडियन बँकेच्या इचलकरंजी शाखेकडून कर्ज घेतले होते. सुमारे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज थकीत असल्याने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई करण्याची नोटीस बँकेने पाठवली होती. मात्र, घरात मंगलकार्य असल्याने जप्ती पुढे ढकलावी, अशी विनंती तक्रारदारांनी बँकेचे कायदा सल्लागार ॲड. पाटणकर याच्याकडे केली. जप्ती पुढे ढकलण्यासाठी पाटणकर याने अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर १ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. 

याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेऊन तक्रार दिली. राष्ट्रीयकृत बँकेच्या कायदा सल्लागाराच्या विरोधात तक्रार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती पुणे येथील सीबीआयच्या अधिका-यांना दिली. तक्रारीची पडताळणी करून तातडीने मंगळवारी रात्री इचलकरंजी येथील बीएसएनएल कार्यालय परिसरातील वकिलाच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची १ लाख ७० हजारांची रक्कम घेताना ॲड. पाटणकर रंगेहाथ सापडला. तो सध्या सीबीआयच्या अटकेत असून, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली.

कारवाईने खळबळ

बँकेच्या कायदा सल्लागारावर कारवाई होण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. जप्ती टाळण्यासाठी वकिलानेच मोठ्या रकमेची लाच घेतल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. राष्ट्रीयकृत बँकेचा सल्लागार असल्याने याचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे. लाचखोरीबद्दल सीबीआयकडून झालेली ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. साताऱ्यात चक्क न्यायाधीशाला लाच घेताना बुधवारीच पकडण्यात आले आणि इकडे इचलकरंजीत वकिलास पकडले. न्याययंत्रणेशी संबंधित या कारवाईचा अनेकांना धक्का बसला. साताऱ्याची कारवाई झाल्यावर वकिलांना आनंद झाला, परंतु तोपर्यंत वकिलासही पकडल्याचे वृत्त आले.

Web Title: Lawyer took bribe of 1 lakh 80 thousand to avoid confiscation, arrested red handed by CBI and ACB team in ichalkaranji Kolhapur District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.