Latakar, Shetke fighting for mayor's post | महापौरपदासाठी लाटकर, शेटके यांच्यात लढत
महापौरपदासाठी लाटकर, शेटके यांच्यात लढत

ठळक मुद्देमहापौरपदासाठी लाटकर, शेटके यांच्यात लढतसंजय मोहिते - भोपळे उपमहापौरसाठी अर्ज

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आघाडीवर असलेल्या ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांनी अनपेक्षितपणे महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे आता सूरमंजिरी लाटकर (राष्ट्रवादी ) व भाग्यश्री शेटके (भाजप) यांच्यात महापौरपदासाठी, तर संजय मोहिते (कॉँग्रेस) व कमलाकर भोपळे (ताराराणी) यांच्यात उपमहापौरपदासाठी लढत होणार आहे. ही निवडणूक मंगळवारी (दि. १९) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे होते. या वेळेत महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या सूरमंजिरी राजेश लाटकर यांनी, तर भाजपच्या भाग्यश्री उदय शेटके यांनी, तसेच उपमहापौरपदासाठी कॉँग्रेसचे संजय वसंतराव मोहिते, तर ताराराणी आघाडीचे कमलाकर यशवंत भोपळे यांनी आपले अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही आघाड्यांकडील नगरसेवक तसेच समर्थक महापालिकेत मोठ्या संख्येने जमले होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या समर्थकांनी फटाकेही फोडले.

गेल्या काही दिवसांपासून ताराराणी आघाडीकडून स्मिता मारुती माने यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत होते. त्याला अनेक संदर्भही होते. ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी माने यांच्यासाठी मोठे जाळेदेखील टाकले होते; परंतु पाच-सहा दिवसांत काहीच जाळ्यात सापडत नाही म्हटल्यावर कदाचित माने यांनीच या शर्यतीतून माघारी घेतली असल्याची चर्चा आहे. त्यांच्या माघारीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जी रंगत भरली होती, ती आता दूर झाली.

भाजप-ताराराणीकडून नगरसेवक फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याची कर्णोपकर्णी माहिती कळताच कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही भाजप, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. भाजपचे दोन, तरराष्ट्रवादीचे दोन नगरसेवक त्यांच्या हाताला लागले असल्याची माहिती समोर आली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉँग्रेसबरोबरची आपली आघाडी कायम ठेवले आहे. त्यामुळे भाजप-ताराराणीचे अवसान गळले. त्यांनी माने यांच्याऐवजी शेटके यांचा उमेदवारी अर्ज भरला. शेटके आणि भोपळे यांचा अर्ज भरणे म्हणजे पराभवाचे निशाण फडकावण्यातीलच प्रकार आहे.

भाजप - ताराराणीचा ‘व्हिप’ लागू

दोन दिवसांपूर्वी कॉँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावल्यानंतर शुक्रवारी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे त्यांच्या नगरसेवकांना व्हिप लागू करण्यात आला. त्यामुळे आता भाजपचे नगरसेवक संभाजी जाधव व जयश्री जाधव काय भूमिका घेणार हे सभागृहात मतदानावेळी स्पष्ट होईल. संभाजी यांचे बंधू, तर जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव सध्या कॉँग्रेसचे आमदार आहेत. त्यांना निवडून आणण्यात आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

किती कालावधी मिळणार?

सूरसंजिरी लाटकर महापौर झाल्यावर त्यांना नेमका किती महिन्यांचा कार्यकाळ मिळणार हे गुलदस्त्यात आहे. राजेश लाटकर यांनी विधानसभा निवडणुकीत ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना कॉँग्रेसकडून काही महिन्यांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे; परंतु कितीही केले तरी हा कार्यकाल सहा महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही.

अशोक जाधव नाराज

उपमहापौरपदासाठी संजय मोहिते यांच्यासह अशोक जाधव हेदेखील इच्छुक होते. आमदार पाटील यांनी दोघांना सहा-सहा महिन्यांकरिता उपमहापौर केले जाईल, असे स्पष्ट केले; परंतु ‘आधी मलाच संधी द्या,’ असा जाधव यांचा आग्रह होता. जेव्हा अर्ज भरण्याच्या आधी काही मिनिटे आमदार पाटील यांच्याशी संपर्क साधला गेला ‘तेव्हा संजय मोहिते यांचा अर्ज भरा,’ असा निरोप दिला. हा निरोप ऐकून जाधव कमालीचे नाराज झाले.
 

 

Web Title: Latakar, Shetke fighting for mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.