Kolhapur: श्रावणातील पहिल्या दोन दिवसांत अंबाबाई चरणी लाखो भाविक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:16 IST2025-07-28T12:15:11+5:302025-07-28T12:16:47+5:30
पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांच्या रांगेचा हा ओघ रात्री दहा वाजेपर्यंत कायम होता

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक स्थान असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रावणातील पहिल्या दोन दिवसांत १ लाख ४ हजार २१९ भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी ३७,०६७ आणि रविवारी ६७,१५२ भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. श्रावणात भाविकांच्या अलोट गर्दीमुळे देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र अंबाबाई मंदिर परिसरात दिसले. पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांच्या रांगेचा हा ओघ रात्री दहा वाजेपर्यंत कायम होता.
श्रावण महिन्यात अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. गेल्या दोन दिवसांत भाविकांच्या गर्दीने लाखांचा टप्पा ओलांडला. रविवारी दिवसभरात ६७ हजार भाविकांची नोंद झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकांनी गर्दी केली. परगावचे भाविक आल्याने पार्किंगच्या जागाही फुल्ल झाल्या होत्या. या भाविकांमध्ये महिलांची संख्या मोठी होती.