Jyotiba Chaitra Yatra 2026: जोतिबा यात्रेचा गुलाली रंग..पाऊसधारा झेलत भाविक दंग
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 1, 2026 16:21 IST2026-04-01T16:18:04+5:302026-04-01T16:21:18+5:30
लाखो भाविकांनी केला चांगभलंचा गजर

छाया : आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा बुधवारी जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन देखील भाविकांची डोंगरावर मोठी गर्दी होती.
गगनचुंबी सासनकाठ्यांचा भार खांद्यावर पेलताना हलगीच्या तालावर होणारे लयबद्ध नृत्य, गुलाल खोबऱ्याची उधळण, मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन, सायंकाळी यमाईचा विवाह, जोतिबा देवाची पालखी.. देवाला सलामी देण्यासाठी वरुणराजाची हजेरी, एकीकडे गडगडाटात कोसळणाऱ्या पाऊसधारा आणि दुसरीकडे भक्तीचा महापूर असा हा अलौकिक सोहळा रंगला.
मानाच्या सासनकाठीच्या पूजनानंतर मिरवणुकीला सुरुवात
चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा भरले. तीन दिवसांच्या या सोहळ्यात आज, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. दुपारी बारा वाजता पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते पाडळी गावच्या पहिल्या व विहेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचे पूजन होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसिलदार माधवी शिंदे आदी उपस्थित होते.
रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले
दरवर्षीच्या तुलनेत यंदा यात्रेला भाविकांची अलोट गर्दी होती. दुपारी ३ वाजता गडगटासह पाऊसधारा सुरु झाल्या. या पावसाच्या सरी झेलत भाविकांनी यात्रा पार पाडली. सायंकाळी साडे पाच वाजता तोफेच्या सलामीने जोतिबाच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांचा विवाह सोहळा. त्यानंतर रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी पुन्हा मंदिराकडे जाते. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर तोफेच्या सलामीने पालखी सोहळा पूर्ण होतो. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान घातले जाते. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे.