पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला, मानेत सळी घुसल्याने मजूर ठार; कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:04 IST2024-09-25T13:03:46+5:302024-09-25T13:04:14+5:30
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवालनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने, आनंद कपूरचंद ...

पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडला, मानेत सळी घुसल्याने मजूर ठार; कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवालनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने, आनंद कपूरचंद मिश्रा (वय २७, सध्या रा.कोतवालनगर, मूळ रा.उत्तर प्रदेश) याच्या मानेत आणि पोटात सळी घुसली. बांधकाम ठेकेदाराने मानेतील सळीसहीत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. ही दुर्घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी घडली.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोतवालनगर येथे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर परप्रांतीय मजूर काम करीत आहेत. यातील आनंद मिश्रा याची मंगळवारी सुट्टी होती. दुपारी तो इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मित्रासोबत बोलत बसला होता. काही वेळाने खाली आल्यानंतर त्याला मोबाइल पहिल्या मजल्यावरच राहिल्याचे लक्षात आले. मोबाइल घेऊन परत येताना पाय घसरून तो खाली बांधकामासाठी ठेवलेल्या सळ्यांवर पडला. पोटात आणि मानेत आरपार सळ्या घुसल्याने तो रक्तबंबाळ झाला.
या दुर्घटनेमुळे घाबरलेल्या मित्राने याची माहिती इतर मजुरांना आणि ठेकेदार विनोद राठोड यांना दिली. राठोड पोहोचताच जखमी मिश्रा याला मानेतील सळीसहित सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, परप्रांतीय मजुरांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद झाली.