एक कोटीहून अधिक आवर्तनांसह कुंकुमार्चन, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांचे मार्गदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:41 IST2026-03-21T19:40:43+5:302026-03-21T19:41:08+5:30
समारोप आज

एक कोटीहून अधिक आवर्तनांसह कुंकुमार्चन, स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर : सकाळचे प्रसन्न, मंगलमय वातावरण; गणपती अर्चना, ललितासहस्रनामाची आवर्तने, महापूजा अशा विविध धार्मिक विधींनी शुक्रवारपासून श्री विद्याकोटी कुंकुमार्चन महायज्ञाला सुरुवात झाली. त्रिपुरसुंदरी श्री ललितामातेचे उपासक स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ललितासहस्रनामाची एक कोटीहून अधिक आवर्तने व कुंकुमार्चन विधी होत आहे. यावेळी स्वामीजींनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पवित्र नगरीत हा महायज्ञ होत असल्याबद्दल आनंद असल्याची भावना व्यक्त केली.
विश्वपंढरी येथे सकाळी नऊ वाजल्यापासून या कुंकुमार्चन साेहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सुमनश्याम, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहितकुमार सिंग उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी न्यायमूर्तींनी विश्वशांती, समाजकल्याणासाठी होत असलेल्या या महायज्ञाला शुभेच्छा दिल्या. ललित गांधी यांनी कोल्हापुरात हा साेहळा हाेत असून, ही सौभाग्याची गोष्ट आहे, असे मत मांडले. या कुंकुमार्चन साेहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषा करून कोल्हापुरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आज, शनिवारी या महायज्ञाचा अखेरचा दिवस असून, अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
युवा पिढीचा अध्यात्माकडे वाढता ओढा सकारात्मक
यावेळी स्वामी अभिषेक ब्रह्मचारी म्हणाले, भारताला लाभलेले सनातन धर्म, अध्यात्म हे सर्वश्रेष्ठ आहे. जगभरात धर्माच्या आधारे यादवी माजलेली असताना भारतीय संस्कृतीने धर्माची खरी परिभाषा जपली आहे. नव्या पिढीचा ओढा अध्यात्माकडे वाढला आहे. ते हे ज्ञान समजून घेत आहेत, त्याचे जीवनात आचरण करत आहेत, ही खूपच सकारात्मक गोष्ट आहे. भलेही रीलच्या माध्यमातून असेल; समाजमाध्यम, इंटरनेटचा वापर करून का असेना, नवी पिढी भारतीय संस्कृतीचे जतन करत आहे, हे महत्त्वाचे आहे.