Kolhapur: जिल्हा नियोजनची वारी, विधानसभेची तयारी; कृष्णराज महाडिक, वीरेंद्र मंडलिक बैठकीला उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:28 IST2025-06-24T12:26:06+5:302025-06-24T12:28:47+5:30
संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेर

Kolhapur: जिल्हा नियोजनची वारी, विधानसभेची तयारी; कृष्णराज महाडिक, वीरेंद्र मंडलिक बैठकीला उपस्थित
कोल्हापूर : कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की चर्चेत येणारे दोन युवा नेत्यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावली. कृष्णराज महाडिक हे स्वतंत्रपणे आले आणि सभागृहात बसले तर मंडलिक हे शासकीय विश्रामगृहावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत आले आणि बैठकीला उपस्थित राहिले. त्यामुळे या दोघांची ‘जिल्हा नियोजन’ची वारी आणि विधानसभेची तयारी’ अशा पद्धतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी सुरू झाली.
खासदार धनंजय महाडिक पंधरा मिनिटांनी स्वतंत्र वाहनातून ताराराणी सभागृहासमोर आले आणि तेथून ते सभागृहात जावून बसले. मंडलिक हे आबिटकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्या पाठीमागेच उभे होते. वीरेंद्र मंडलिक हे अधूनमधून रोखठोक बोलत कागल तालुक्याचे राजकारण हलवू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय कलगीतुराही रंगला होता. त्यामुळे या दोन युवा नेत्यांची उपस्थिती चर्चेची ठरली.
संबंध नसलेले आत आणि पत्रकार बाहेर
ही बैठक संवैधानिक असल्याने या बैठकीशी संबंध नसलेल्यांनी सभागृहात प्रवेश करू नये. त्यांच्यावर कारवाई करू, असा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा देणारा फलक ताराराणी सभागृहाबाहेर लावण्यात आला आहे. परंतु संबंध नसणारे किमान १०/१५ कार्यकर्ते, नेते सभागृहात बसून होते आणि जिल्ह्याच्या विकासाचे नियाेजन नेमके कसे होते हे जनतेला सांगणाऱ्या पत्रकारांना मात्र प्रशासनाने आत बसण्यास मज्जाव केला होता. हा विरोधाभास यावेळी दिसून आला.