कोल्हापूर : रजिस्ट्रार ॲन्ड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांनी हद्दवाढीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. एकदा निवडणूक जाहीर झाली की २०२७ पर्यंत हद्दवाढ करता येणार नाही. आता महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली, मात्र, हद्दवाढीबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आधी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करा त्यानंतर निवडणुका घ्या, अशी मागणी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने गुरुवारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.प्रत्येकवेळी हद्दवाढीसाठी सरकार अनुकुल असते, मात्र, अंमलबजावणी का होत नाही. सध्या महायुतीमध्येच हद्दवाढीबाबत एकमत नाही. त्यातच आता प्रभाग रचना जाहीर झाली आहे. रजिस्ट्रार ॲन्ड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांनी हद्दवाढ करणे किंवा बदल करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर मार्च २०२७ पर्यंत हद्दवाढ करता येणार नसल्याचा आदेश दिला आहे.
वाचा - कोलकात्याहून रुग्ण घेऊन विमान आले, प्रकृती बिघडताच कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग जर महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर हद्दवाढ पुन्हा रखडणार आहे. त्यासाठी डिसेंबरपूर्वी हद्दवाढीची घोषणा करायला हवी. महापालिकेने नवीन हद्दवाढ प्रस्ताव, अहवाल, स्मरणपत्र सरकारला पाठविले आहे का, असल्यास त्याची माहिती जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सचिन चव्हाण, अमित अतिग्रे, ॲड. सतीश नलवडे, दिलीप पोवार, राजू जाधव उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना भेटणारशहराची हद्दवाढ नेमकं कोण रोखत आहे, असा सवाल करत हद्दवाढीची घोषणा कधी करणार, हे विचारण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना भेटणार असल्याचे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रारूप प्रभाग रचना नगरविकासच्या आदेशानुसारप्रभागरचना जाहीर झाल्याने महापालिकेची निवडणूक अधिकृतपणे जाहीर झाली आहे का, असा सवाल कृती समितीचे आर. के. पोवार यांनी पत्राद्वारे उपस्थित केला होता. त्यावर महापालिकेने निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. प्रभाग रचनेचे काम निवडणूक विभागाच्या आदेशाने सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले.