तब्बल ५१ हजार रुपयाचे 'कोल्हापुरी चप्पल'; राजेंद्र शिंदेंनी बनविलेल्या चपला 'व्यापार मेळ्या'त ठरल्या सर्वोत्कृष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 18:44 IST2025-12-09T18:35:11+5:302025-12-09T18:44:52+5:30
इटलीतूनही मागणी; शिक्षकी पेशात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी पारंपरिक चर्मकार कला जोपासण्याचा निर्णय घेतला

तब्बल ५१ हजार रुपयाचे 'कोल्हापुरी चप्पल'; राजेंद्र शिंदेंनी बनविलेल्या चपला 'व्यापार मेळ्या'त ठरल्या सर्वोत्कृष्ट
दत्तात्रय पाटील
म्हाकवे : कोल्हापूर या कलानगरीत नाविन्यपूर्ण कलाकारी सादर करण्याची नेहमीच रस्सीखेच असते. बानगे (ता. कागल) येथील राजेंद्र गोविंदा शिंदे यांनीही अनेक वर्षांपासून सर्वोत्कृष्ट कोल्हापुरी चप्पल बनविण्याचा ध्यास घेतला होता. अत्यंत परिश्रम आणि जीव ओतून त्यांनी बनविलेल्या चपला दिल्ली येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट ठरल्या.
त्यांच्या चपलाच्या एका जोडीची तब्बल ५१ हजार रुपये किंमत करण्यात आली. त्यांच्या नावीन्यपूर्ण चपलांची दखल घेत इटलीतूनही मागणी वाढत असल्याने कोल्हापुरी चपला सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. शिंदे हे कोल्हापुरी चप्पल डेव्हलपमेंट प्रोजेक्टचे मास्टर ट्रेनर म्हणून काम पाहतात.
शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण बानगे येथे झाले. गारगोटी येथे बी. ए., बी. एड. केले. मात्र, शिक्षकी पेशात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्यांनी पारंपरिक चर्मकार कला जोपासण्याचा निर्णय घेतला. मडिलगे (ता. भुदरगड) येथील आनंदा रावण यांच्याकडे चप्पल बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर शिंदे हे २५ वर्षे चप्पल कारागीर म्हणून काम करत आहेत.
दरम्यान, दोन्ही पायातील चपलांचे वजन एकसारखे ठेवण्यात शिंदे यांचा हातखंडा आहे. कोल्हापुरी चपला अधिक दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या कशा होतील, यासाठी ते प्रयत्नशील असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे कौतुक केले.
गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये कोल्हापुरी चप्पलचे नाव जावं, यासाठी प्रयत्नशील आहे. आता एक लाख रुपये किंमत येईल, अशा नाविन्यपूर्ण चपला बनविण्याचा मानस आहे. चर्मकार समाजाचा मेळावा घेऊन याबाबत प्रशिक्षण देण्याचाही प्रयत्न करू. -राजेंद्र शिंदे, कोल्हापुरी चप्पल कारागीर