मुलाखतीदरम्यान कोल्हापुरी चप्पलची बदनामी, पुण्यातून बोलावून विचारला जाब - video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:44 IST2025-07-09T16:43:31+5:302025-07-09T16:44:59+5:30
अखेरीस अनुराग कोकितकर यांनी माफी मागितली

मुलाखतीदरम्यान कोल्हापुरी चप्पलची बदनामी, पुण्यातून बोलावून विचारला जाब - video
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पलची मुलाखतीदरम्यान बदनामी केल्याच्या तक्रारीवरून येथील चप्पल व्यावसायिकांनी पुण्यात चप्पल व्यवसाय करणारे अनुराग कोकितकर यांना मंगळवारी कोल्हापुरात बोलावून जाब विचारला. अखेरीस कोकितकर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
‘प्राडा’ कंपनीने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करत इटली येथील प्रदर्शनात ती सादर केली. तिचा तिथे अनेकांनी वापरही केला. याबाबत कोल्हापूरच्या कारागिरांना श्रेय देण्याचेही सौजन्य कंपनीने दाखवले नव्हते. यावर संताप व्यक्त होताच कंपनीने आपली चूक मान्य केली. या पार्श्वभूमीवर गेले दहा-बारा दिवस विविध माध्यमांवर कोल्हापुरी चप्पलबद्दल चर्चा, मुलाखती सुरू असताना मूळचे कोल्हापूरचे पण पुण्यात कोल्हापुरी चप्पलचे ब्रॅण्डिंग आणि विक्री करणारे अनुराग कोकितकर यांनी दिलेल्या मुलाखतीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या चप्पल लाइनच्या कोल्हापुरी चप्पल बनावट असल्याचा आरोप केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी प्राडा कंपनीचे समर्थन केल्याने कोल्हापूरचे चप्पल व्यावसायिक संतप्त झाले.
त्यांनी कोकितकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोल्हापुरात येण्यास सांगितले. त्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास चप्पल लाइनच्या एका दुकानात बोलावून या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला. यावेळी खडाजंगी झाल्यानंतर कोकितकर यांनी माफी मागितली. यापुढे कोल्हापुरी चप्पलची बदनामी सहन करणार नसल्याचा इशारा कोल्हापूर फुटवेअर असोसिएशन, छत्रपती शिवाजी मार्केट चप्पल लाइन व्यावसायिकांनी दिला आहे.