Kolhapur ZP Election Results 2026: नेत्यांच्या पत्नीसह लेकी, सुनांना गुलाल; भरमू पाटील यांच्या सुनेचा मात्र पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:07 IST2026-02-10T16:06:54+5:302026-02-10T16:07:20+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवले त्यातील माजी ...

Kolhapur ZP Election Results 2026: नेत्यांच्या पत्नीसह लेकी, सुनांना गुलाल; भरमू पाटील यांच्या सुनेचा मात्र पराभव
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी खुले झाल्याने नेत्यांनी आपल्या पत्नीसह, लेकी, सुना यांना मैदानात उतरवले त्यातील माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांच्या सुनेचा अपवाद वगळता अन्य सर्व उमेदवारांना जनतेने निवडून दिले आहे.
१. गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पत्नी शैलजा पाटील या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या.
२. कागल तालुक्यातील बोरवडे मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या आई शोभा गणपतराव फराकटे या चुरशीच्या लढतीत विजयी झाल्या. त्या यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. पक्षाच्या महिला अध्यक्षा शीतल फराकटे यांनी दिलेले सोशल आव्हान त्यांनी गावपातळीवरील वर्चस्वाच्या जीवावर मोडून काढले.
३. राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे मतदारसंघातून ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांची कन्या अमृता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या. त्यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत बरेच रणकंदन झाले. परंतु डोंगळे यांनी मुलीला निवडून आणून सार्वजनिक निवडणुकीतील पराभवाचा डाग पुसून काढला. ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे यांच्या पत्नी भाग्यश्री या काँग्रेसकडून निवडणूक पराभूत झाल्या.
वाचा : अध्यक्षपद राष्ट्रवादीला शक्य; पाटील, फराकटे, डोंगळे चर्चेत
४. शाहूवाडी तालुक्यातील पिशवी-बांबवडे मतदारसंघातून राजकुंवर रणवीर गायकवाड या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून विजयी झाल्या. त्या ओबीसी पुरुष गटातून जिंकल्या आहेत. त्यांचे पती रणवीर हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. राजकुंवर यांच्या सासू शैलजा गायकवाड या जिल्हा परिषदेत निवडून येऊन सभापती झाल्या होत्या.
५. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली मतदारसंघातून सुयशा अंबरिश घाटगे या भाजपकडून विजयी झाल्या आहेत. त्या महायुतीच्या उमेदवार असल्याने मंत्री हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांचीही ताकद त्यांच्यामागे होती. मुळात या मतदार संघात तिन्ही गटांची ताकद चांगली असल्याने आणि अंबरिश घाटगे यांनी पायाला पाने बांधून केलेला प्रचार त्यांच्या विजयास कारणीभूत ठरला.
६. भाजपचे इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका कोरोची मतदारसंघातून विजयी झाल्या. त्या आमदार राजेंद्र यड्रावकर यांच्या होणाऱ्या सून आहेत.
७. करवीर तालुक्यातील शिंगणापूर संघातून काँग्रेसकडून रसिका अमर पाटील या लोकसंपर्काच्या बळावर दुसऱ्यांदा जिंकल्या. गत निवडणुकीत त्या अपक्ष निवडून आल्यावर त्या शिक्षण सभापती झाल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या त्या सून आहेत.