नोटांनी भरला शिपायाचा खिसा, आता अहवाल द्यायचा कसा?; कोल्हापूर जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकाराची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:23 IST2025-04-04T12:22:54+5:302025-04-04T12:23:11+5:30
कोल्हापूर : दिवस ३१ मार्चचा. वेळ रात्री साडे आठची. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आपल्या दालनातून बाहेर पडले. पहिल्या ...

नोटांनी भरला शिपायाचा खिसा, आता अहवाल द्यायचा कसा?; कोल्हापूर जिल्हा परिषदेत घडलेल्या प्रकाराची चर्चा
कोल्हापूर : दिवस ३१ मार्चचा. वेळ रात्री साडे आठची. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आपल्या दालनातून बाहेर पडले. पहिल्या मजल्यावरील प्रत्येक विभागाची पाहणी करत ते गर्दी असलेल्या बांधकाम विभागाकडे निघाले. ते आलेत म्हटल्यावर त्यांच्यासाठी दार उघडणाऱ्या शिपायाचे खिसे फुगलेले त्यांनी पाहिले. तपासणीअंती सगळ्या खिशात पैसेच भरले होते. या प्रकाराचा अहवाल देण्याचा त्यांनी आदेश दिला आणि या प्रकाराची चर्चा सुरू झाली. परंतु, आता अहवाल नेमका काय द्यायचा, या विवंचनेत अधिकारी पडले आहेत.
कार्तिकेयन हे गतवर्षी मार्चमध्येच जिल्हा परिषदेत हजर झाले होते. ३१ मार्चची येथील गर्दी पाहून त्यांनी ठेकेदारांना इकडे यायला लागू नये, अशी प्रणाली तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, याबाबत फारसे काही झाले नाही. यंदाही ३१ मार्च रात्री साडेआठनंतर ते सर्व विभाग फिरत बांधकाम विभागात निघाले. त्यांच्यासाठी दार उघडणाऱ्या शिपायाच्या फुगलेल्या खिशांकडे त्यांचे लक्ष गेले. खिशात काय आहे, असे त्यांनी विचारल्यानंतर त्याची बोबडी वळली. तो बाजुला होत असतानाच कार्तिकेयन यांनी सोबत असलेल्या शिपायाला त्याचे खिसे तपासायला सांगितले. तेव्हा त्याच्या खिशातून ५०० रुपयांच्या नोटा निघाल्या.
हे नेमके काय आहे, अशी विचारणा करत कार्तिकेयन यांनी विभागप्रमुखांना सर्व काम झाल्यानंतर या प्रकाराची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सीईओ मुंबईला बैठकीसाठी गेल्याने दोन दिवस नव्हते. त्यामुळे आता या घटनेचा नेमका अहवाल काय द्यायचा, यावर खल सुरू झाला आहे.
लाभदायी मार्चअखेर
बांधकाम, वित्त, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्यमंत्री सडक योजना, आरोग्य विभाग या ठिकाणी मार्चअखेरीस मोठी लगबग असते. ऐनवेळचा निधी पदरात पाडून घेण्यापासून बिले काढण्यापर्यंतची लगबग सुरू असल्याने शिपायांची यात महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे अनेक विभागांच्या शिपाई, लिपिकांसह अधिकाऱ्यांना मार्चअखेर लाभदायी असल्याचीही चर्चा यानिमित्ताने रंगली.