कोल्हापूर : कागल तहसिलदारसह दोन तलाठ्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:59 IST2018-05-18T17:59:58+5:302018-05-18T17:59:58+5:30
अडीच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी संशयित कागल तहसिलदार किशोर घाडगेसह दोन तलाठ्यांना न्यायालयाने सोमवार (दि. २१) पर्यंत पोलिस कोठडी दिली .

कोल्हापूर : कागल तहसिलदारसह दोन तलाठ्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
कोल्हापूर : अडीच लाख रुपयांच्या लाच प्रकरणी संशयित कागल तहसिलदार किशोर घाडगेसह दोन तलाठ्यांना न्यायालयाने सोमवार (दि. २१) पर्यंत पोलिस कोठडी दिली . पण, या तिघांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी दूपारी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. घाडगे याचा अहवाल शनिवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात येणार असल्याचे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी सांगितले.
कसबा सांगाव (ता. कागल) येथील संजय जगताप यांच्या वडिलांच्या नांवे सुळकुड येथे ७६ गुंठे जमीन आहे. ७/१२ पत्रकीवर नांव नोंद करण्यासाठी गुरुवारी (दि. १७) तलाठी शमशहाद मुल्ला व मनोज भोजे यांनी अडीच लाख रुपयांची लाच कागल तहसिलदार कार्यालयात घेतली. ही लाच तहसिलदार घाडगे यांच्या सांगण्यावरुन घेतली असल्याचे त्यांनी पोलिसांना तपासात सांगितले. त्यामुळे घाडगे यांच्यासह पोलिसांनी तिघांनी अटक केली.
शुक्रवारी किशोर घाडगे, तलाठी शमशहाद मुल्ला व मनोज भोजे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिघांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. त्यानंतर तिघांना वैद्यकिय चाचणीसाठी सीपीआरमध्ये नेण्यात आले.
त्यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्याने त्यांची तपासणी केली असता तब्येत बिघडल्याचा अहवाल पोलिसांना त्यांनी दिला. त्यामुळे त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली नाही.ते सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. वैद्यकिय अधिकाºयाच्या या अहवालामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचणी येत आहेत.
घाडगे यांच्या नागाळा पार्क येथील घरझडतीबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे .तसेच या तिघांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. घाडगेचा अहवाल जिल्हाधिकारी सुभेदार यांना देण्यात येणार असल्याचे गोडे यांनी सांगितले.