इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:55 IST2025-07-21T11:55:33+5:302025-07-21T11:55:53+5:30
रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे.

इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
कोल्हापूर :रक्षाबंधन हा उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा आणि त्यातून शून्य कचरानिर्मिती व्हावी, या हेतूने कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीजराख्यांची निर्मिती केली आहे. उत्सवानंतर या बियांपासून पुन्हा रोपे उगवणार आहेत.
प्रत्येक सणानंतर निर्माण होणारा कचरा आणि त्याची विल्हेवाट ही प्रशासनासाठी एक डोकेदुखीच बनली आहे. यासाठीच काही वर्षांपासून उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर येथील राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या १५० विद्यार्थ्यांनी बीज राख्यांची निर्मिती केली आहे. या राख्यांत असलेल्या बीजांपासून रोपे येतील.
विविध प्रकारच्या बियांचा वापर
मुलांनी शेंदरी, लाल भोपळा, घोसावळे, मका, खरबूज, राळ, मोहरी, बहावा यांच्या बिया वापरून राख्याही बनविल्या. या राख्या नंतर कुंडीमध्ये, मातीत पुरल्यास त्यातील बीजांपासून रोपे येतील आणि त्यासाठी वापरलेला दोरा आणि कागद हे मातीत विघटित होतील. त्याचेही प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
विद्यार्थ्यांची आगळीवेगळी ‘बीज राखी’ कार्यशाळा
रक्षाबंधनाच्या तयारीसाठी राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन एक आगळीवेगळी ‘बीज राखी’ कार्यशाळा घेण्यात आली. यात १५० विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना देशी बीजांपासून संपूर्णपणे पर्यावरणपूरक राखी कशी बनवायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्वदेखील शिक्षकांकडून समजावून सांगण्यात आले.