कोल्हापूर :  पिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 10:58 AM2018-08-30T10:58:30+5:302018-08-30T11:03:45+5:30

नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Kolhapur: Streets of crops have been stuck in the rain, Gramsevak, Talathi, agricultural assistants, Pankanme | कोल्हापूर :  पिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे

कोल्हापूर :  पिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे

googlenewsNext
ठळक मुद्देपिकांचे पंचनामे अडकले पावसात, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक करणार पंचनामे कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप बाधित

कोल्हापूर : नुकसान केलेल्या खरीप पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाऊस उघडीप देत नसल्याने पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर खरीप क्षेत्र पावसाने बाधित झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला असून, तीन महिन्यांत तब्बल १७ हजार ५२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मोठा फटका बसला असून, नदीकाठच्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. उभा ऊस आठ-दहा दिवस पाण्याखाली राहिल्याने वाढ खुंटली आहे. त्यात जास्त दिवस उसाच्या सुरळीत पाणी राहिल्याने कुजण्याची प्रक्रिया वेगाने झाल्याने नदीकाठचे ऊस शंभर टक्के संपले आहेत.

उर्वरित ठिकाणचे ऊस पिकेही अडचणीत आली आहेत. साधारणत: कोणत्याही पिकाला सूर्यप्रकाश लागतोच, त्याशिवाय वाढ होत नाही; पण तीन महिने एकसारखा पाऊस राहिल्याने ऊस गारठला आहे. आपल्याकडे जून, जुलै मध्ये पाऊस असला तरी आॅगस्टमध्ये उघडझाप राहते, पावसाचे एखादे ‘नक्षत्र’ लागले, तरी दुसरे कोरडे जाते; त्यामुळे या काळात पिकांची वाढ जोमदार होते.

यंदा मात्र सलग पाऊस असल्याने जमिनीतील ओलावा कमीच झालेला नाही. भात, सोयाबीन, भुईमूग, नागली या पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. ज्वारी व नागली ही पिके कमी पाण्यावर येतात. अतिपावसाने वाढ खुंटली आहे, ज्वारीही तीन महिन्यांत बाहेर पडते; पण सध्या ज्वारीची उंची दीड ते दोन फुटांपर्यंतच असल्याने उत्पादन घटणार हे निश्चित आहे.

जिल्ह्यात ऊस, भात, सोयाबीन व भुईमूगाचे ३ लाख ४६ हजार ६९२ हेक्टर क्षेत्र आहे. यांपैकी १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाने दिले आहेत.

स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे; पण पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. नदीकाठच्या क्षेत्रात अजून पाणी असल्याने अधिकाऱ्यांना तिथेपर्यंत जाता येत नसल्याने गोची झाली आहे.

‘९२००५’ ऊस करपला!

सततच्या पावसाने सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. उसातही ‘९२००५’ या वाणाला अधिक झटका बसला असून ‘करपा’ आणि सुरळीत पाणी गेल्याने सारे पिकच करपल्यासारखे झाले आहे. परिणामी उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार आहे.

भाताला ‘पानफोल’चा धोका

अलिकडील पाच-सहा वर्षांत लवकर येणाऱ्या भाताच्या वाणाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ‘तेली आमसा’, ‘राशी पूनम’ या वाणाचे भात साडे तीन महिन्यांत परिपक्व होते. याबरोबरच मे महिन्यात धूळवाफ पेरणी झालेले भाताची लोंबे बाहेर पडली आहेत. अशा कालावधीत एकसारखा पाऊस घातक असून ‘पानफोल’ होण्याचा धोका आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

यंदा पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खते व बियाण्यांचे वाढलेल्या दरामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे; त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.


नदीकाठचे ऊस पूर्णपणे संपले आहेत, उर्वरित ठिकाणच्या उसावर तांबेराचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. इतर पिकांचेही पावसाने मोठे नुकसान झाले आहे.
- युवराज खाडे (शेतकरी, सांगरुळ)

 

 

Web Title: Kolhapur: Streets of crops have been stuck in the rain, Gramsevak, Talathi, agricultural assistants, Pankanme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.