कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार शिवराज्याभिषेक सोहळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:48 IST2018-01-03T16:41:11+5:302018-01-03T16:48:25+5:30
शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे.

दिल्ली येथे राजपथावर प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या महाराष्ट्राच्या संचलनामध्ये सहभागी होणाऱ्या चित्ररथामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती सहभागी होणार आहे. या प्रतिकृतीची पाहणी खासदार संभाजीराजे यांनी केली.
कोल्हापूर : किल्ले रायगडावर ६ जून १६७४ रोजी शिवछत्रपती महाराजांना झालेला राज्याभिषेक तरुणांना स्फूर्तीदायक आहे. या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, तसेच भावी तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने शिवरायांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती चित्ररथाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्यात येणार आहे.
किल्ले रायगडावर शिवछत्रपती महाराजांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक संपन्न झाला. मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना झाली. या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, तसेच भावी तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने शिवरायांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रयत्नाने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर हा सोहळा अनुभवता येणार आहे. राजपथावर होणाऱ्या संचलनामध्ये या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती असणाऱ्या चित्ररथाच्या माध्यमातून हा इतिहास जगासमोर मांडण्यात येणार आहे.
मुघल सत्तेला मूळातून हादरा देणारी शिवराज्याभिषेकाची घटना अखंड भारतवर्षाचा भाग्योदय करणारी आहे. खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने किल्ले रायगडावर प्रतिवर्षी ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून लाखो शिवभक्त गडावर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात.
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही शिवरायांचा तेजस्वी इतिहास सांगणारा एखादा कार्यक्रम घेण्याचे संभाजीराजेंचे प्रयोजन आहे. प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे राजपथावर संचलन होत असते. यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी राजपथावर उपस्थित असतात.
या मान्यवरांच्या आणि विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर चित्ररथाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा साऱ्या जगासमोर मांडण्याचा निश्चय संभाजीराजे यांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून संभाजीराजे यासाठी पाठपुरावा करीत होते. एक महिन्यापूर्वीच संभाजीराजेंच्या दिल्ली येथील निवासस्थानी या चित्ररथासाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी राजेंनी त्यामध्ये काही आवश्यक बदलही सुचविले होते.
येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या दिमाखदार चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला पहायला मिळेल. हा सर्व शिवभक्तांसाठी अभिमानाचा क्षण असेल. शिवरायांचा वैभवशाली इतिहास देश-विदेशात पोहचविण्यासाठी आम्ही सदैव कृतीशील प्रयत्न करीत आहोत.
संभाजीराजे छत्रपती,
खासदार