Prepare the development plan of Kolhapur: SambhajiRaje's appeal; Special image should be created | कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा तयार करा : संभाजीराजे यांचे आवाहन; विशेष प्रतिमा निर्माण व्हावी

कोल्हापूर : कोल्हापुरातील स्थानिक उद्योजक, कारागीरांमधील कौशल्याला पुरेसे पाठबळ देणे. औद्योगिक, व्यापारी वर्गाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा तयार करावा. त्यासाठी अकरा अथवा एकवीस जणांची समिती स्थापन करावी. या समितीने तयार केलेल्या आराखड्यातील मागण्या मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी येथे दिली.

कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज, इंडियन मर्चंटस् चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज (आयएमसी) आणि वेसमॅकतर्फे आयोजित निर्यात वृद्धिस प्रोत्साहन याविषयावर विशेष परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील या कार्यक्रमास ‘आयएमसी’ चे अध्यक्ष डॉ. ललित कनोडीया, महाव्यवस्थापक अरविंद प्रधान, सह संचालक ख्याती नरवणे, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक आॅफ इंडियाचे (एक्झिम बँक) मुख्य प्रबंधक समर्थ चतुर्वेदी, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे उप सरव्यवस्थापक सृष्टीराज अम्बस्था प्रमुख उपस्थित होते.

खासदार संभाजीराजे म्हणाले, मुंबई, नागपूरच्या तुलनेत औद्योगिक, पर्यटन, व्यापारच्या दृष्टीने कोेल्हापूर विकासात पिछाडीवर आहे. कोल्हापूरमध्ये प्राथमिक सुविधा, वातावरण अनुकूल असून देखील येथे मोठे उद्योग येण्याचे धाडस करीत नाहीत. याचा गांभीर्याने विचार करुन हे चित्र बदलण्यासाठी कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा तयार करावा. शिवाय शहराची एक विशेष प्रतिमा निर्माण व्हावी. या आराखड्यामध्ये महत्वाच्या मागण्याच्या समावेश करावा. यातील मागण्या मार्गी लावण्यात येतील.

कोल्हापुरात मंगळवारी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित निर्यात वृद्धिस प्रोत्साहन या विशेष परिसंवादाचे उदघाटन ‘आयएमसी’चे अध्यक्ष डॉ. ललित कनोडीया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी शेजारी खासदार संभाजीराजे, ललित गांधी, समर्थ चतुर्वेदी, सृष्टीराज अम्बस्था, अरविंद प्रधान, संजय शेटे, चंद्रकांत जाधव, जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, संजय पाटील, शिवाजीराव पोवार उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

या कार्यक्रमात ब्रिटन संसदेत आयोजित केलेल्या इंडिया टेक्नॉलॉजी मन्थमध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनोरमा इन्फोसोलुशनच्या सीइओ आश्विनी दानिगोंड यांचा खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उद्योगपती सचिन मेनन, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, गोशिमाचे अध्यक्ष सुरजितसिंग पवार, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, ‘कोल्हापूर चेंबर’ चे संचालक चंद्रकांत जाधव, संजय पाटील, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया, आदी उपस्थित होते.

‘कोल्हापूर चेंबर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. यात कोल्हापूरच्या योग्य मार्केटिंगसाठी ‘ब्रँड कोल्हापूर’ वेबपोर्टल, अ‍ॅप सादर केले जाईल. येथे निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्याचे त्यांनी जाहीर केले. जयेश ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष संजय शेटे यांनी आभार मानले.

विमानसेवेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

या कार्यक्रमात ‘कोल्हापूर चेंबर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी खासदार, आमदार, हवाई उड्डाण केंद्रीय मंत्री अशोक राजू यांच्याकडून कोल्हापूरची विमानसेवा सुरु होण्यासाठी तारखांची आश्वासने दिली जात आहेत. दि. १५ डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरु न झाल्यास उद्योजक, व्यापारी विमानतळावर आंदोलन करतील,असा इशारा दिला.

यावर खासदार संभाजीराजे यांनी विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चेंबर आॅफ कॉमर्सने त्यासाठी आंदोलनात वेळ न दवडता विकासाची योजना प्राधान्याने तयार करावी, असे आवाहन केले.