कोल्हापूर-सांगली महामार्ग जमीन हस्तांतर: शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील आठ गावांतील निर्बंध उठले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 16:05 IST2023-12-07T16:05:12+5:302023-12-07T16:05:27+5:30
राजू शेट्टी यांनी केला जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा

कोल्हापूर-सांगली महामार्ग जमीन हस्तांतर: शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील आठ गावांतील निर्बंध उठले
जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये १० गावांचा समावेश आहे, असे असताना भूसंपादन विभागाच्यावतीने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अठरापैकी आठ गावांवरील निर्बंध प्रशासनाने उठविले आहेत.
प्रशासनाने हातकणंगले व शिरोळ तालुक्यांतील चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, तारदाळ, मजले, हातकणंगले, दानोळी, कोथळी, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव, चिपरी, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती व जयसिंगपूर या १८ गावांतील खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्याचबरोबर या गावांतील खरेदी-विक्री करावयास झाल्यास प्रकल्प संचालक राष्ट्रीय प्राधिकरण कोल्हापूर यांच्याकडील नाहरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेऊन पाठपुरावा केला. तसेच याबाबत जयसिंगपूर क्रेडाई यांच्यावतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले होते.
या गावांना मिळाला दिलासा
बुधवारी झालेल्या नवीन आदेशानुसार कोल्हापूर-सांगली महामार्गातील चोकाक ते उदगावपर्यंतच्या जमीन हस्तांतरामध्ये चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, मजले, हातकणंगले, जैनापूर, उमळवाड, उदगाव, तमदलगे, निमशिरगाव, या गावांचा समावेश करण्यात आलेला असून, तारदाळ, चिपरी, कोंडिग्रे, नांदणी, धरणगुत्ती, जयसिंगपूर, दानोळी व कोथळी ही गावे वगळण्यात आलेली आहेत. यामुळे वरील आठ गावांतील खरेदी-विक्रीकरिता आता राष्ट्रीय महामार्गाच्या परवानगीची गरज लागणार नाही.