कोल्हापूरचा शाही दसरा राज्याच्या प्रमुख महोत्सवांत, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 11:34 IST2025-09-12T11:34:20+5:302025-09-12T11:34:53+5:30

पर्यटनवाढीला चालना

Kolhapur Royal Dussehra among major festivals of the state, boosts tourism growth | कोल्हापूरचा शाही दसरा राज्याच्या प्रमुख महोत्सवांत, जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा 

संग्रहित छाया

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानीची धर्मसत्ता.. राजर्षी शाहू महाराजांची संस्थानकालीन राजसत्तेचा मिलाफ असलेल्या कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा समावेश आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत झाला आहे. गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अध्यादेशाद्वारे याची घोषणा केली आहे. यंदा २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान हा शाही दसरा महोत्सव होत आहे.

कोल्हापूर राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी असून, तिला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. येथील शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात असून, म्हैसूरपाठोपाठ कोल्हापूरचा हा साेहळा प्रसिद्ध आहे. दसरा महोत्सवांतर्गत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण केले जाते.

वाचा - आधी कोल्हापूरची हद्दवाढ, नंतर निवडणुका घ्या, कृती समिती आक्रमक

कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजेच श्री अंबाबाईचे मंदिर आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देशातील विविध भागांतून श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी किमान ३०-४० लाख भाविक येतात. तसेच १९१ वर्षांपूर्वी २ ऑक्टोबर रोजी आलेल्या दसरा सणादिवशीच भवानी मंडप कमानीचे उद्घाटन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील पन्हाळगडाचा जागतिक वारसास्थळात समावेश झाला आहे. तसेच श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे उपलब्ध आहेत. त्यातच दसरा महोत्सवाला राज्याच्या मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटन वाढणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शासनाला प्रस्ताव सादर करून मंत्रालयीन स्तरावर विशेष पाठपुरावा केला. अखेर त्या प्रयत्नाला यश आले.

शाही दसरा महोत्सवाचा पर्यटन विभागामार्फत सन २०२५-२६ या वर्षातील आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवाच्या दिनदर्शिकेच्या प्रमुख पर्यटन महोत्सव या यादीत समावेश झाला आहे. या दर्जामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याची भावना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी व्यक्त केली.

Web Title: Kolhapur Royal Dussehra among major festivals of the state, boosts tourism growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.