ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांची पाण्यासाठी धावपळ, प्रशासनाविरोधात तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:20 IST2025-08-28T16:20:25+5:302025-08-28T16:20:49+5:30
केवळ २० टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा महापालिकेचा केविलवाणा प्रयत्न

ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांची पाण्यासाठी धावपळ, प्रशासनाविरोधात तीव्र संताप
कोल्हापूर : काळम्मवाडीतून आणलेल्या थेट पाइपलाइनमुळे कोल्हापूरवासीयांची पाण्याच्या टंचाईतून मुक्तता होईल ही अपेक्षा प्रशासनाने फोल ठरवली असून, गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळातच कोल्हापूरवासीयांना बुधवारी पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. घरात पुरेसे पाणी न आल्याने ए. बी. वॉर्डासह उपनगरांमधील नागरिकांना पाण्यासाठी टँकरच्या मागे धावाधाव करण्याची वेळ आली.
विशेष म्हणजे गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्यासाठी सुरू असलेला हा खेळ गणेशाच्या आगमनादिवशीही नागरिकांच्या वाट्याला आल्याने शहरवासीयांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महानगरपालिकेने १७ टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असला तरी टँकरद्वारे किती नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले हाच संशोधनाचा विषय झाला आहे.
शहर व उपनगराला सध्या काळम्मवाडीतून आणलेल्या थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काळम्मावाडी येथील पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणातच पाण्याची बोंबाबोंब झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मध्यरात्रीपासून जागे राहण्याची वेळ आली आहे.
विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी महापालिकेने बुधवारी पहाटेपासून १७ टँकरद्वारे विविध भागात पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे ऐन सणातच सण साजरा करायचा सोडून नागरिकांना पाण्यासाठी टँकरच्या मागे धावण्याची वेळ आली. अनेक नागरिकांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागरण करण्याची वेळ आली.
प्रशासनाचा निष्काळजीपणा
गेल्या काही दिवसांपासून थेट पाइपलाइनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे ऐन सणाच्या काळात हे बिघाड होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष बिघाड झाल्यानंतर मनपाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज रस्त्यावर उतरवण्यापेक्षा बिघाड होण्याआधीच ही काळजी का घेतली नाही, असा सवाल विचारला जात आहे.
या भागात सर्वाधिक पाणीटंचाई
बालगोपाल तालीम, शाहू मैदान, वेताळ तालीम, बापूरामनगर, गंजीमाळ, प्रथमेशनगर, कळंबा रिंगरोडसह ए, बी. वॉर्डमध्ये पुरेशा दाबाने पाणी न आल्याने नागरिकांना अक्षरश: पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली.
ठेकेदाराचे अधिकारी नामानिराळे; मनपा अधिकाऱ्यांची डोकेदुखी
काळम्मावाडी योजनेची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर आहे. परंतु प्रत्येक वेळी ठेकेदाराचे कर्मचारी बेजबाबदार, नामानिराळे राहतात आणि नागरिकांच्या संतापाला महापालिका अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
पुण्यातून मागवले क्रोबार असेंबली किट
काळम्मावाडी पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मंगळवारी रात्री तिसऱ्या टेस्टिंगवेळी आलेला एरर काढून टाकल्यानंतर बुधवारी पहाटे ४.५० वाजता चौथ्या टेस्टिंगदरम्यान पुन्हा एरर आला. त्यामुळे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी पुणे महापालिका प्रशासक नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधून पुणे महापालिकेकडून संपूर्ण क्रोबार असेंबली किट पुणे महापालिकेकडून मागवले. बुधवारी रात्री काळम्मावाडी येथे फिटिंगचे काम सुरू होते.