कोल्हापूर : ‘अमृतरजनी'तून रजनीताईंच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 16:41 IST2018-08-27T16:38:31+5:302018-08-27T16:41:52+5:30
प्रसिद्ध गायिका कै. रजनी करकरे-देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराने ‘अमृतरजनी’ मैफलीतून रजनीतार्इंच्या आठवणींना उजाळा दिला.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात आयोजित ‘अमृतरजनी’ कार्यक्रमात रजनीतार्इंचे शिष्य प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी यांच्यासह शिष्यपरिवाराने गीत मैफल रंगविली.
कोल्हापूर : प्रसिद्ध गायिका कै. रजनी करकरे-देशपांडे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिष्य परिवाराने ‘अमृतरजनी’ मैफलीतून रजनीतार्इंच्या आठवणींना उजाळा दिला.
शाहू स्मारक भवन येथे हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने हा कार्यक्रम रंगला. यावेळी इंद्रनील चंद्रकांत यानी ‘साध्यसुंदरी ही... येई हसत मधुरमंद विश्वसुंदरी ही...’, ‘तरुण आहे रात्र अजुनी...’, ‘जीवलगा राहिले रे...’, अशा अवीट गीतांची मैफल रंगली.
रजनीतार्इंच्या निधनानंतर पहिल्यांदाच झालेल्या या मैफलीत त्या उपस्थित नसल्या तरी त्यांच्या स्मृती आणि गाण्यांच्या रूपाने रसिकांच्या मनात कायम राहिल्या.
यावेळी रजनीतार्इंचे शिष्य प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, प्रसेनजित कोसंबी, प्रशांत नंदे, शर्वरी जाधव, कीर्ती अंबपकर, आदिती देसाई, ऋचा करकरे यांचा स्वरसाज होता. प्रशांत देसाई, शिवाजी गुरव, सचिन जगताप, केदार गुळवणी, विजय पाटकर, गुरू ढोले यांची साथसंगत, तर अनुराधा तस्ते यांचे निवेदन होते.
‘कलांजली’ आणि हेल्पर्स आॅफ हॅन्डिकॅप्ड या दोन्ही संस्थांमध्ये रजनीताई कार्यरत होत्या. गतवर्षी २ सप्टेंबरला रजनीतार्इंनी अखेरचा श्वास घेतला. पुढील आठवड्यात त्यांचा पहिला स्मृतिदिन, मात्र त्यापूर्वीच आलेला त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस दिमाखात साजरा करण्याचा निर्णय शिष्य परिवाराने घेतला आणि कार्यक्रम रंगला. यावेळी मंजिरी कर्वे-आलेगावकर यांच्या हस्ते रविराज पोवार, गणी फरास, सुचित्रा मोर्डेकर, सुनंदा देशपांडे, शोभाताई रेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.