कोल्हापूर : प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, सर्वपक्षीय कृति समितीतर्फे महावितरणला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 17:46 IST2018-07-25T17:44:36+5:302018-07-25T17:46:40+5:30
महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधवारी केली.

सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन महावितरणचे अभियंता अनिल भोसले यांना देताना समितीचे पदाधिकारी.
कोल्हापूर : महावितरणतर्फे वीज दरवाढ करण्यात येणार आहे. या वीज दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईत होरपळून जाणार आहे; त्यामुळे प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने महावितरणचे मुख्य अभियंता अनिल भोसले यांच्याकडे बुधवारी केली.
याप्रसंगी निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, महावितरणच्या ग्राहकांना नजिकच्या काळात वीज दरवाढीचा धक्का बसणार आहे. वीज दरवाढीचा प्रस्ताव महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाला सादर केला असून, त्यात घरगुती वापरासाठीच्या विजेच्या दरात ५ टक्के वाढ सूचवली आहे. महसुलातील तूट भरून काढण्यासाठी ही दरवाढ प्रस्तावित असली तरी ग्राहकांना वीज अखंडितपणे मिळत नाही. ही अन्यायकारक दरवाढ जनता कदापि सहन करणार नाही.
सहनिमंत्रक बाबासो पार्टे म्हणाले, वीज दरवाढ करून वीज ग्राहकांना बिले आली तर त्या बिलाची होळी आपल्या कार्यालयासमोर करण्यात येईल. प्रस्तावित वीज दरवाढीचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा वेगवेगळ्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला.
याप्रसंगी दिलीप पोवार, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, अशोक भंडारे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप माने, तानाजी पाटील, फिरोजखान उस्ताद, रणजित काकडे, समीर शेख, आदी उपस्थित होते.